कोण होणार पुरंदरचा आमदार (फोटो- टीम नवराष्ट्र)
सासवड/संभाजी महामुनी: पुरंदर हवेली मतदार संघाचा निवडणुकीची आज सासवड मधील नवीन प्रशासकीय इमारतीत मोजणी होणार आहे. यासाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली असून ठरलेल्या वेळेत मतमोजणी पूर्ण व्हावी या दृष्टीने प्रशासनाचे प्रयत्न आहेत.पुरंदरच्या निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले असून मतमोजणी सुरु झाल्यावर काही तासातच संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे. तीनही उमेदवार तगडे आणि मातब्बर असून सर्व उमेदवारांच्या कार्यकर्त्यांकडून विजयाचे दावे करण्यात आले आहे. तर यंदाच्या निवडणुकीत महिला मतदारांनी प्रचंड उत्साह दाखविल्याने त्यांची मते निर्णायक ठरणार हे नक्की. त्यामुळे मतदाना मधील महिलांचा वाढलेला टक्काच पुरंदरचा आमदार पक्का करणार असे एकूण चित्र आहे.
पुरंदर विधानसभेसाठी किमान ७० ते ७५ टक्के पर्यंत मतदान होईल असा सर्वत्र अंदाज बांधला जात होता. मात्र तो अंदाजच राहिला. ग्रामीण भागातील मतदारांनी चांगला उत्साह दाखविल्याने गावोगावी ७० ते ८० टक्के पर्यंत मतदान झाले. त्या तुलनेत शहरी भागात मात्र खूप कमी मतदान झाले. कमी झालेल्या मतदानाचा फटका कुणाला बसणार आणि कुणाला फायदा होणार हे पाहणेही औस्तुक्याचे ठरणार आहे. पुरंदर हवेली मतदार संघात एकूण ४ लाख ६४ हजार १७ मतदार असून यामध्ये २ लाख ४० हजार ५३८ पुरुष तर २ लाख २३ हजार ४४६ स्त्री मतदार आहेत. एकूण मतदान २ लाख ८३ हजार १५८ झाले असून यामध्ये १ लाख ४९ हजार ४६५ पुरुष तर १ लाख ३३ हजार ६८७ स्त्री मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. टक्केवारी नुसार ६२. १४ टक्के पुरुष तर ५९. ८३ टक्के स्त्री मतदार आहेत.
एकूणच मतदान प्रक्रियेत मतदारांचा वाढता सहभाग नेहमीच निकालाला कलाटणी देणारा ठरला आहे. साहजिकच या निकालात महिलांचे मतदान पुन्हा एकदा निर्णायक ठरणार आहे. महायुतीचे उमेदवार विजय शिवतारे यांनी यापूर्वी तीन वेळा निवडणूक लढवली असून दोन वेळा विजय प्राप्त केला आहे. मागील वेळी आमदार संजय जगताप यांच्याकडून पराभव स्वीकारल्यानंतर यावेळी पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. तर विद्यमान आमदार संजय जगताप यांनी विजय शिवतारे यांच्याकडून दोन वेळा पराभव पत्करला असून मागील वेळी विजय शिवतारे यांचा पराभव केला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे कट्टर समर्थक असलेले सनदी अधिकारी असलेले संभाजीरावझेंडे यांनी मागील निवडणुकीत संजय जगताप यांना साथ दिली होती. मात्र यंदा त्यांना उमेदवारी न मिळाल्याने घड्याळ ची साथ घेवून आपले नशीब अजमावीत आहेत. तिघाही उमेवारांचे नशीब बदलविणारी निवडणूक असल्याने महत्वाची निवडणूक ठरली आहे.
यापूर्वी प्रत्येक निवडणुकीत निकालाचे चित्र स्पष्ट असल्याने संबंधित उमेदवारांचे कार्यकर्ते जोमात होते मात्र यंदा तीनही उमेदवार मातब्बर आणि एकास एक असून प्रत्येकाकडून विजयाची खात्री देण्यात येत आहे. परिणामी कार्यकर्त्यांमध्ये फारसा उत्साह अद्यापपर्यंत तरी दिसून येत नाही. एकंदरीतच निकाल सुरु झाल्यानंतर पहिल्या काही फेऱ्या पूर्ण झाल्यावर चित्र स्पष्ट होणार आहे. त्यानंतरच कार्यकर्त्यांचा उत्साह जाणवणार आहे. त्यामुळे कोण होणार पुरंदरचा आमदार ? कोण ठरणार बाजीगर ? कुणाचे पारडे राहणार जड ? महिलांचा मतदानाचा वाढलेला टक्का कुणासाठी फायदेशीर ? या सर्व प्रश्नांची उत्तरे काही तासांत मिळणार आहेत.