
मुंबईकरांचा प्रवास होणार सुसाट! दहिसर - भाईंदर लिंक रोडच्या कामाला गती; कुठपर्यंत आलंय काम?
या प्रकल्पाच्या उभारणीचे काम ए, बी, सी, डी, ई, एफ आणि दहिसर – भाईंदर जोड रस्ता (DBLR) अशा एकूण सात टप्प्यांमध्ये विभागण्यात आले आहे. दहिसर – भाईंदर जोड रस्ता हा मुंबई आणि मिरा- भाईंदर परिसरातील महत्त्वाचा प्रकल्प असून प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या टप्प्यात आहे. यामुळे दहिसर पश्चिम ते भाईंदर पश्चिम यांच्यात थेट आणि जलद रस्ते संपर्क निर्माण होणार आहे. या रस्ते प्रकल्पाची एकूण लांबी सुमारे 5.135 किलोमीटर आहे. त्यात उन्नत मार्ग, खारफुटी क्षेत्रातील खांबांवरील रस्ता, खाडीवरील उन्नत संरचना, खारपाण जमीन क्षेत्रावरील उन्नत मार्ग, वाहतूक विखुरण्यासाठी जोडमार्ग व आंतरबदल आणि उड्डाणपूल आदी विविध प्रकारच्या अभियांत्रिकी संरचनांचा समावेश आहे.
कार्यस्थळास अभिजीत बांगर यांची भेट
दहिसर – भाईंदर जोड रस्ता प्रकल्पातील सुमारे 3.83 किलोमीटर लांबीचा आणि 45 मीटर रूंदीचा मुख्य उन्नत रस्ता हा मुंबई किनारा रस्त्याचा (उत्तर) अंतिम भाग आहे. या कार्यस्थळास अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी भेट दिली. तसेच प्रारंभिक कामांची माहिती घेतली. सद्यस्थितीत गॅबियन भिंतीचे कुंपण काम सुरू आहे. तसेच, पुलाच्या पायाभरणीसाठी पाइल्स (खोल पाया) आणि त्यावर पाइल कॅप तयार करण्यात येत आहे.
ही कामे झाली पूर्ण
60 पायाभूत खांब (Pile), 5 पाइल कॅप (Pile Cap), पुलाचे 4 आधारस्तंभ (Pier), आधारस्तंभाचा शीर्षभाग (Pier Cap), पुलाचा बांधकाम भाग (Segment) 9 आदी कामे पूर्ण झाली आहेत. कार्यस्थळी अत्याधुनिक यंत्र सामुग्री उपलब्ध असून तात्पुरते प्रवेश पूल यंत्रणा कार्यान्वित आहे. ऑक्टोबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात लाँचिंग गर्डरचे काम सुरू करण्यात येणार आहे. त्याची सविस्तर माहिती अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी घेतली.
अतिरिक्त महानगरपालिका आयुक्तांचे निर्देश
प्रकल्पासाठी आवश्यक भूसंपादन प्रक्रिया वेगाने पूर्ण करावी. त्यासाठी प्राधान्य क्रम निश्चित करावा. विविध प्राधिकरणांसह मिरा – भाईंदर महानगरपालिकेचे सहकार्य घ्यावे. सुरक्षाविषयक प्रमाणित कार्यप्रणालीचे (SOP) अत्यंत काळजीने पालन करावे. कामे सुरू असताना सुरक्षेच्या दृष्टीकोनातून कार्यस्थळी बॅरिकेडिंग करावे, कामे गुणवत्तापूर्ण आणि वेळेत पूर्ण करावीत. सदर काम डिसेंबर 2028 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवून नियोजन व अंमलबजावणी करावी, असे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी दिले.