हिंगोलीतील तलाठी संतोष पवार यांच्या हत्येच्या निषेधार्थ सिंधुदुर्गात आज काम बंद आंदोलन (फोटो सौजन्य - istockphoto)
हिंगोलीत सरकारी कार्यालयात घुसून एका तलाठ्याची हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील आडगांव रंजे येथे तलाठी कार्यालयात संतोष पवार हे शासकीय कामकाज करत असताना भर दिवसा चाकूहल्ला करत त्यांची हत्या करण्यात आली. या घटनेचा रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा तलाठी संघाने निषेध व्यक्त केला असून आज जिल्ह्यात काम बंद आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन्ही जिल्ह्यातून सर्व तलाठी, मंडळ अधिकारी, मंडळ अधिकारी संवर्गातील अव्वल कारकुन नायब तहसीलदार, तहसिलदार या काम बंद आंदोलनात सहभागी होणार आहेत.
हेदेखील वाचा- कल्याण बाजारपेठेत पोलिसांची मोठी कारवाई; गर्दीचा फायदा घेत मोबाईल चोरणारे चोरटे गजाआड
याबाबत जिल्हाधिकारी किशोर तावडे यांना संघटनेच्यावतीने निवेदन देण्यात आले आहे. या घटनेमुळे मृत तलाठी संतोष पवार यांचे संपूर्ण कुटुंब उध्वस्त झाले आहे. तलाठी यांचा कोणताही दोष नसताना केवळ चुकीच्या संशयावरून त्यांना जीव गमवावा लागला आहे. या घटनेमुळे कर्मचारी यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या घटनेचा निषेध म्हणून महाराष्ट्र राज्य तलाठी पटवारी मंडळ अधिकारी समन्वय महासंघ तसेच महाराष्ट्र राज्य तलाठी संघ यांनी शासनास दिलेले पत्र व घेतलेल्या निर्णयानुसार काम बंद आंदोलन पुकारण्यात आलं आहे. या आंदोलात रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा तलाठी संघ सहभागी होणार आहेत.
रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व तलाठी, मंडळ अधिकारी, मंडळ अधिकारी संवर्गातील अव्वल कारकुन नायब तहसीलदार तहसिलदार या काम बंद आंदोलनात सहभागी झाले आहेत, असे निवेदन रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा तलाठी संघाचे अध्यक्ष एस. व्ही , गवस , उपाध्यक्ष डी.एम . पाटील यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.
हेदेखील वाचा- नवऱ्याने फोन चेक करत घेतला चारित्र्यावर संशय, बायकोनं उचललं टोकाचं पाऊल; संभाजीनगरातील घटना
निवेदनात म्हटलं आहे की, हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील आडगांव रंजे येथे केवळ चुकीच्या संशयावरून तलाठी संतोष पवार यांच्यावर चाकू हल्ला करत त्यांची हत्या करण्यात आली. या घटनेचा रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा तलाठी संघाने निषेध व्यक्त केला आहे. केवळ चुकीच्या बातम्या व संशयावरून एका कर्मचाऱ्याला जीव गमवावा लागला या घटनेमुळे कर्मचारी यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या घटनेचा निषेध म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा तलाठी संघ यांनी एक दिवसीय काम बंद आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील आडगावमध्ये सरकारी कार्यालयात घुसून एका तलाठ्याची हत्या करण्यात आली. या हल्लेखोराने तलाठ्याच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून चाकूहल्ला केला. तलाठी कार्यालयात प्रलंबित शेती कामानिमित्त आलेल्या एकाने तलाठ्याच्या डोळ्यात मिरचीपूड फेकून चाकूहल्ला केला. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या तलाठ्याचा उपचारासाठी नेत असताना वाटेतच मृत्यू झाला.