राज ठाकरे अन् उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा, योगेश कदम म्हणाले; निवडणूक जिंकण्यासाठी...
पुणे : गेल्या काही दिवसांपासून शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांची युती होणार असल्याची चर्चा सुरू आहे. वरळीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या विजयी मेळाव्यानंतर दोन्ही ठाकरे बंधूंची अनेकदा भेट देखील झाली आहे. दरम्यान उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या शिवतीर्थवर जाऊन राज ठाकरे यांची भेट घेतली. कौटुंबीक भेटीनंतर ही दोन्ही ठाकरे बंधूंमधील पहिलीच राजकीय भेट होती. यावरुन आता गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी प्रतिक्रीया दिली आहे. मुंबईत राहणाऱ्या मराठी माणसांना आकर्षित करून त्यांची मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूकीत मते मिळावीत यासाठी उद्धव आणि राज ठाकरे हे दोन्ही बंधू एकत्र आले आहेत. यामुळे मराठी माणसे जोडली जातील मात्र मते मिळणार नाहीत, असे मत गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी मांडले.
योगेश कदम म्हणाले, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना मुंबईच्या मराठी माणसांसाठी काही करू शकले नाहीत. याऊलट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील मराठी माणसांच्या घरांचा प्रश्न मार्गी लावला. गिरणी कामगारांचे प्रश्न सोडवले. लोकसभा निवडणुकीत मराठी माणसाने ठाकरेंना साथ दिली नाही. त्यामुळे फक्त मुंबई महापालिका निवडणूक जिंकण्यासाठी उद्धव ठाकरेंचे प्रयत्न सुरू असल्याचे मराठी माणसाला ठाऊक आहे, असं कदम म्हणाले.
पुढे बोलताना कदम म्हणाले, राज्याच्या मंत्रिमंडळातील कॅबिनेट आणि राज्यमंत्र्यांमध्ये कुठलाही संघर्ष नाही. सुरूवातीला थोडाफार प्रमाणात त्रास सहन करावा लागला. परंतू, मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्र्यांनी उत्तम समन्वय ठेवल्याने आता राज्यमंत्र्यांना अडचणी येत नाहीत. मुख्यमंत्र्यांकडे गृह खाते असून त्यांनी मला कामासाठी मोकळीक दिली आहे. कॅबिनेट मंत्र्यांकडून राज्यमंत्र्यांच्या कारभारात हस्तक्षेप होत नाही. राज्यमंत्र्यांना जितके अधिकार दिले आहेत त्यात उत्तम कामगिरी करून दाखविण्याचा माझा मानस आहे.
आईच्या नावावर डान्सबार सुरू असलेल्या आरोपांवर कदम म्हणाले, आम्ही हॉटेल भाडयाने चालविण्यास दिले. भाडेकरूने कुठला व्यवसाय करायचा तसेच व्यवसाय चांगला आहे की वाईट याची जबाबदारी संबंधित भाडेकरूची आहे. डान्सबारचा कदम कुटुंबियांशी संबंध नसून फक्त प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न विरोधक पक्षांकडून करण्यात आल्याचे कदम यांनी सांगितले.
पोलिस आयुक्तांना निर्देश
पुण्याच्या गणेशोत्सवात महिला पत्रकाराचा विनयभंग आणि छायाचित्रकारांशी झालेले गैरवर्तन या घटना गंभीर स्वरूपाच्या असून पोलिस आयुक्तांना कठोर कारवाईचे निर्देश देणार असल्याचे कदम यांनी कार्यक्रमात जाहीर केले. पत्रकार समाजाच्या हितासाठी काम करत असतो. त्यामुळे पत्रकारांवर होणारे हल्ले व चूकीच्या घटनांवर तातडीने कारवाई झाली पाहिजे. पत्रकारांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी सहकार्याची भुमिका ठेवली पाहिजे, असेही कदम यांनी स्पष्ट केले.