मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी हाती आली आहे. मुंबईत झिका आजाराचा एक ७९ वर्षीय रूग्ण एम पश्चिम विभागाच्या चेंबूर येथे आढळला. या रुग्णाला झिका आजारावर उपचार देऊन घरी सोडण्यात आले. या रूग्णाला १९ जुलै २०२३ पासून मधुमेह, उच्च रक्तदाब, खोकला, ह्दयरोग, थॅलेसेमिया अशी लक्षणे होती. मुंबईत झिका व्हायरसचा आढळलेला हा पहिला रूग्ण आहे. राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था (पुणे) यांनी सदर रूग्णाबाबतची माहिती दिली.
मुंबई महानगरपालिकेच्या अहवालात दिलेल्या माहितीनुसार, रुग्णामध्ये झिका विषाणूचे लक्षणे आढळल्यानंतर त्याला तातडीने बीएससी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. रुग्णाच्या कुटुंबातील काही सदस्य नुकतेच परदेशातून परतले असल्याची माहिती आहे. या सर्वांची वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे. रुग्ण राहत असलेल्या सोसायटीमधील नागरिकांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. मात्र, चाचणी करण्यात आलेल्या इतर कोणत्याही व्यक्तीमध्ये झिकाचे लक्षणे आढळले नाहीत. महाराष्ट्रातील झिकाचा पहिला रुग्ण जुलै २०२१ मध्ये पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील बेलसर येथे आढळून आला होता.
लक्षणे काय आहेत?
झिका हा एडिस इजिप्ती डासामुळे होणारा सौम्य आजार आहे. झिका विषाणू एडिस डासाच्या चाव्याव्दारे मानवी शरीरात प्रवेश करतो. या आजाराच्या 80 टक्के रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. तर इतर संक्रमित लोकांमध्ये ताप, सांधेदुखी, स्नायू दुखणे, डोकेदुखी, डोळे लाल होणे, उलट्या होणे, शरीरावर लाल पुरळ येणे अशी लक्षणे दिसतात.