
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
‘राजा शिवाजी’ या बहुप्रतिक्षित ऐतिहासिक चित्रपटातील पहिलं गाणं ‘राजा शिवाजी अँथम – छत्रपती’ आज अधिकृतरीत्या प्रदर्शित करण्यात आलं आहे. हे गाणं जिओ स्टुडिओज आणि मुंबई फिल्म कंपनी यांच्या सहकार्याने सादर करण्यात आलं असून, संगीत क्षेत्रातील मोठ्या प्लॅटफॉर्मवर ते रिलीज झालं आहे.हे गाणं छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य, स्वाभिमान आणि हिंदवी स्वराज्याच्या गौरवशाली इतिहासाला समर्पित आहे. त्यामुळे हे फक्त गाणं नसून, प्रेक्षकांना अभिमान आणि प्रेरणा देणारं एक भव्य संगीतमय अनुभव ठरत आहे.
प्रसिद्ध संगीतकार जोडी अजय–अतुल यांनी ‘राजा शिवाजी अँथम – छत्रपती’ या गाण्याला संगीत दिलं आहे. हे गाणं मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषांमध्ये तयार करण्यात आलं असून, गायक अजय गोगावले यांच्या दमदार आवाजामुळे त्याला विशेष उठाव मिळाला आहे. हिंदी आवृत्तीचे बोल प्रसिद्ध गीतकार मनोज मुंतशिर यांनी लिहिले आहेत.
या गाण्याची खास गोष्ट म्हणजे तब्बल ८० गायकांच्या समूहाने ते सादर केलं आहे, त्यामुळे त्याची भव्यता आणखी वाढली आहे. गाण्यातील प्रत्येक सूर आणि ताल हा स्वराज्याचा अभिमान आणि एकजूट याची जाणीव करून देतो.
हे गाणं ऐकताना फक्त संगीताचा आनंद मिळत नाही, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची आठवण देखील ताजी होते. भव्य दृश्यं, दमदार संगीत आणि प्रभावी शब्द यामुळे हे गाणं प्रेक्षकांच्या मनाला भिडतं आणि अभिमानाची भावना निर्माण करतं.
प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक रेमो डिसूझा यांनी या गीताचे नृत्यदिग्दर्शन केले असून, प्रत्येक दृश्यातून गीतातील भावविश्व अधिक प्रभावीपणे उलगडते. दृश्य आणि संगीत यांचा सुंदर संगम साधत, हे गीत प्रेक्षकांसमोर एक सजीव, उर्जावान आणि प्रेरणादायी अनुभव साकारते. प्रत्येक फ्रेममध्ये जाणवणारी ऊर्जा, अभिमान आणि एकात्मता ही ‘राजा शिवाजी’च्या भव्यतेची साक्ष देते.
या गीताबाबत बोलताना संगीतकार अजय-अतुल म्हणतात की , “हे गाणे फक्त भव्य असावे इतकेच आमचे ध्येय नव्हते, तर त्यात भावना, प्रामाणिकपणा आणि आदराची जाणीव असणे अत्यंत महत्त्वाचे होते. प्रत्येक सूरामध्ये एक जबाबदारी आहे आणि ती म्हणजे त्या वारशाचा सन्मान राखण्याची. आम्ही या गीतामधून श्रोत्यांच्या मनात अभिमानाची आणि प्रेरणेची ठिणगी पेटवण्याचा प्रयत्न केला आहे. जर या गीतामुळे प्रेक्षकांच्या अंगावर शहारे आले, तर ते आमच्यासाठी यश आहे; पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे, हे गीत त्यांच्या मनात कायम राहावं, हीच खरी आपल्या महाराजांसाठी मानवंदना ठरेल.
घृणास्पद! मुस्लीम अभिनेत्याची हिंदू अभिनेत्रीला ‘बीफ’ खाण्यासाठी जबरदस्ती, Video Viral; नेटकऱ्यांचा संताप अनावर
चित्रपटात अनेक मोठे कलाकार एकत्र
‘राजा शिवाजी’ हा चित्रपट रितेश देशमुखने लिहिला आणि दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात अनेक मोठे कलाकार एकत्र दिसणार आहेत, ज्यामध्ये संजय दत्त, अभिषेक बच्चन, विद्या बालन, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, बोमन इराणी, भाग्यश्री, फरदीन खान, जितेंद्र जोशी, अमोल गुप्ते, जिनिलिया देशमुख यांचा समावेश आहे.हा चित्रपट १ मे २०२६ रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये मराठी आणि हिंदी भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. जिओ स्टुडिओज आणि मुंबई फिल्म कंपनी यांच्या सहकार्याने तयार झालेला हा भव्य ऐतिहासिक चित्रपट प्रेक्षकांना प्रेरणादायी अनुभव देणार आहे.
दरम्यान, ‘राजा शिवाजी अँथम – छत्रपती’ हे गाणं सध्या सर्व प्रमुख प्लॅटफॉर्मवर रिलीज झालं असून त्याला प्रेक्षकांकडून जोरदार प्रतिसाद मिळत आहे. या अँथममुळे चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली असून, हा चित्रपट केवळ सिनेमा न राहता एक मोठा सांस्कृतिक सोहळा ठरेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.