Madhurani Prabhulkar Bought New Home : गेल्या काही महिन्यांमध्ये अनेक कलाकारांनी नवीन लक्झरियस कार्स आणि घर घेतलं आहे. या यादीत अनेक मराठमोळ्या सेलिब्रिटींचा समावेश आहे. सई ताम्हणकर, प्रसाद ओक, रोहित माने, शिवाली परब आणि भूषण प्रधान या लोकप्रिय कलाकारांपाठोपाठ मराठी मनोरंजनसृष्टीतील आणखी एका अभिनेत्रीने नवीन घर खरेदी केली आहे. ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील अरुंधती म्हणजेच प्रसिद्ध अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर हिने नवीन घर खरेदी केलं आहे.
मधुराणीने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत घर घेतल्याची ‘गुड न्यूज’ दिली आहे. अभिनेत्रीनं मुंबईमध्ये घर घेण्याचं स्वप्न लेकीच्या साथीनं पाहिलं होतं. मधुराणी आणि तिच्या लेकीचं स्वप्न पूर्ण झाल्यानंतर इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत एक पोस्ट शेअर केली आहे. शेअर केलेल्या पोस्टमध्ये अभिनेत्री म्हणते, “मुंबईत आपलं स्वतः चं घर असावं, आणि तेही विलेपार्ले पूर्व इथेच. हे अनेक वर्षं हृदयाशी जपून ठेवलेलं स्वप्न… ते स्वप्न पूर्ण होणं आणि लेकीच्या साथीनं त्या स्वप्नपूर्तीचा आंनद द्विगुणित होणं हे सगळंच अनमोल आहे. आज मन कृतज्ञतेने भरून आलंय. आई वडिलांचे आणि सर्व थोरा मोठ्यांचे कृपाशीर्वाद, गुरुकृपा, आणि असंख्य शुभचिंतकांच्या सदिच्छा निव्वळ ह्यामुळेच हे स्वप्न साकारलंय….!!! सविनय व सादर आभार”
मधुराणी प्रभुलकरने हे नवीन घर विलेपार्लेमध्ये घेतलं आहे. अभिनेत्रीने आणि तिच्या लेकीने व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना नवीन घराची सैर केली आहे. अद्याप मधुराणीच्या नव्या घरामध्ये कोणतेही काम करण्यात आलेले नाही. लवकरच अभिनेत्री ह्या नव्या घरामध्ये शिफ्ट होईल. मुधराणीच्या पोस्टवर चाहत्यांसोबत अनेक मराठी कलाकारांनीही कमेंट्स करत तिचं कौतुक केलं आहे. सुकन्या मोने, अपूर्वा गोरे, आश्विनी कासार, आश्विनी महांगडे, निरंजन कुलकर्णी सह अनेक सेलिब्रिटींनी मधुराणीवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. सुकन्या मोने यांनी “मनःपूर्वक अभिनंदन! खरं आहे पार्ल्यात घर घेणं सोप्प नाहीये. पण, ते तू करून दाखवलं आहेस” अशी कमेंट करत मधुराणीचे कौतुक केले.