सूरज चव्हाणचा 'राजा राणी' सिनेमा रिलीज, किरण मानेची बिग बॉस विजेत्यासाठी खास पोस्ट
बिग बॉस विजेता सूरज चव्हाणचा ‘राजा राणी’ सिनेमा आज थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. त्याचा हा पहिलाच मराठी सिनेमा असून त्याच्या ह्या सिनेमासाठी फक्त चाहतेच नाही तर, सेलिब्रिटी उत्सुक आहेत. सूरज चव्हाणच्या ह्या सिनेमाची गेल्या अनेक दिवसांपासून जोरदार चर्चा होत आहे. त्याच्या ह्या पहिल्या सिनेमासाठी अभिनेता किरण मानेनी इन्स्टाग्राम पोस्ट केली आहे.
शेअर केलेल्या पोस्टमध्ये किरण माने म्हणतो, “…सुरज चव्हाण या नावानं आज ग्लॅमरची दुनिया आपल्या अस्सल गावरान मातीत खेचून आणली. इंडस्ट्रीतल्या आजच्या अनेक मोठमोठ्या स्टार्सना पहिला ब्रेक देणार्या केदार शिंदेसारख्या गॉडफादरनं सुरजला एक सिनेमा दिला. रितेश देशमुखनंही त्याला त्याचा मॅनेजर दिला आहे, अशी बातमी वाचली मी परवा. लै भारी वाटतं हे सगळं बघून.पण एक गोष्ट त्याहून भारी वाटली. ती म्हणजे यापुर्वी सुरज जेव्हा फक्त एक रीलस्टार होता, तेव्हा त्याचं टॅलेंट शिवाजी दोलताडे या कर्जत तालुक्यातल्या कोरेगांवच्या दिग्दर्शकानं हेरलं होतं. ”
“त्याला एका सिनेमात सेकंड लीड भुमिका दिली होती. तो सिनेमा आज, १८ ऑक्टोबरपासून संपुर्ण महाराष्ट्रात रिलीज होतोय… ‘राजा राणी’ ! महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातले, सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी घरातले कलाकार या सिनेमात चमकत आहेत. रोहन पाटील आणि वैष्णवी शिंदे ही जोडगोळी प्रमुख भुमिकेत आहे. माझा दोस्त आणि ‘सैराट’ फेम तानाजी गळगुंडे यानंसुद्धा सुरज बरोबर काॅमेडीची मैफल रंगवली आहे. आपल्या मातीतल्या कलाकारांचा गावरान तडका असलेला भन्नाट सिनेमा आजपासून रिलीज होतोय… आपल्या पोरांसाठी मी बघणार.. तुम्हीही नक्की बघा… राजा राणी !”
हे देखील वाचा – सूरज चव्हाणसाठी गौतमी पाटीलचा ठसका, ‘तुझ्यासाठी आले…’, भेटीचा व्हिडिओ तुफान व्हायरल
चित्रपटात प्रमुख भूमिकेत रोहन पाटील, वैष्णवी शिंदे ही जोडी दिसणार असून या चित्रपटात सुरज चव्हाण ,भारत गणेशपुरे, सुरेश विश्वकर्मा, माधवी जुवेकर, भक्ती चव्हाण, शिवाजी दोलताडे, तानाजी गलगुंडे या कलाकारांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. ‘सोनाई फिल्म क्रिएशन’ प्रस्तुत ‘राजाराणी’ या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद, गीतलेखन व निर्मिती गोवर्धन दोलताडे यांनी केलं आहे. तर चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी शिवाजी दोलताडे यांनी सांभाळली आहे. संगीत दिग्दर्शन पी. शंकरम, पार्श्वसंगीत विजय नारायण गवंडे, गायक आदर्श शिंदे, हर्षवर्धन वावरे, अनविसा दत्तगुप्ता, नागेश मोरवेकर हे आहेत.