
फोटो सौजन्य - Social Media
4 जून 2026 रोजी प्रदर्शित झालेल्या पेद्दीने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर दमदार सुरुवात केली. चित्रपटाने भारतात ११२.४९ कोटी रुपयांची ग्रॉस कमाई नोंदवत अनेकांचे लक्ष वेधून घेतले. दुसऱ्या दिवशीही चित्रपटाची घोडदौड कायम राहिली. चित्रपटाने भारतात २६.९० कोटी रुपयांची नेट कमाई केली. त्यामुळे दोन दिवसांतील भारतातील एकूण कमाई ११४.४९ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. प्रेक्षकांकडून मिळणारा प्रतिसाद आणि विकेंडची सुरुवात लक्षात घेता येत्या काही दिवसांत चित्रपट आणखी मोठे विक्रम प्रस्थापित करू शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
देशांतर्गत कमाईसोबतच परदेशी बाजारपेठेतही पेद्दीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. दुसऱ्या दिवशी चित्रपटाने परदेशातून आणखी ८ कोटी रुपयांची कमाई केली. त्यामुळे चित्रपटाची एकूण ओव्हरसीज कमाई ३६ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. भारत आणि परदेशातील कमाई मिळून पेद्दीचा जागतिक गल्ला आता १५०.४९ कोटी रुपयांपर्यंत पोहोचला आहे. या आकड्यांमुळे हा चित्रपट २०२६ मधील मोठ्या ओपनर्सपैकी एक ठरला आहे.
विशेष म्हणजे, एस. एस. राजामौली यांच्या ब्लॉकबस्टर RRRनंतर राम चरणच्या कारकिर्दीतील हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा ओपनर ठरला आहे. RRRमुळे जागतिक स्तरावर लोकप्रियता मिळवलेल्या राम चरणकडून चाहत्यांच्या अपेक्षा खूप वाढल्या होत्या. गेम चेंजरला अपेक्षित यश मिळाले नसले तरी पेद्दीच्या माध्यमातून त्याने जोरदार पुनरागमन केल्याचे मानले जात आहे.
या चित्रपटातून राम चरण आणि जाह्नवी कपूर ही जोडी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर एकत्र दिसत आहे. दोघांची ऑनस्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असल्याचे सोशल मीडियावरील प्रतिक्रियांवरून दिसून येत आहे. यापूर्वी जाह्नवी कपूरने देवरा: पार्ट १मध्ये ज्युनियर एनटीआरसोबत काम केले होते. त्यामुळे पेद्दी हा तिचा आणखी एक मोठा दाक्षिणात्य प्रकल्प ठरला आहे.
दिग्दर्शक बुची बाबू सना यांनी चित्रपटाची जबाबदारी सांभाळली असून त्यांनी ग्रामीण पार्श्वभूमी, भावनिक संघर्ष आणि मनोरंजन यांचा प्रभावी मेळ घालण्याचा प्रयत्न केला आहे. चित्रपटात राम चरण आणि जाह्नवी कपूर यांच्यासोबत विजय सेतुपती, बोमन इराणी, दिव्येंदू शर्मा आणि जगपती बाबू यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. या सर्व कलाकारांच्या अभिनयालाही सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.
चित्रपटातील राम चरणच्या अभिनयाचे विशेष कौतुक होत आहे. ग्रामीण ढंगाच्या भूमिकेत त्याने स्वतःला पूर्णपणे झोकून दिल्याचे समीक्षकांचे मत आहे. रोमँटिक, क्रीडा आणि संघर्षप्रधान प्रसंगांमध्ये त्याची दमदार उपस्थिती जाणवते. विशेषतः भावनिक दृश्यांमध्ये त्याने दाखवलेली अभिनयाची खोली प्रेक्षकांना भावत आहे. त्यामुळे पेद्दी हा केवळ कमाईच्याच नव्हे तर अभिनयाच्या बाबतीतही राम चरणसाठी महत्त्वाचा चित्रपट ठरत असल्याची चर्चा सुरू आहे.