फोटो सौजन्य - Social Media
चित्रपटातील काही दृश्यांमुळे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात टीका होत असल्याचे लक्षात आल्यानंतर बुची बाबू सना यांनी एक्स (पूर्वीचे ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये त्यांनी प्रेक्षकांच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर त्याबद्दल खेद व्यक्त केला. सिनेमा हा केवळ मनोरंजनाचे साधन नसून तो प्रेक्षकांशी संवाद साधणारा आणि त्यांना प्रेरणा देणारा प्रभावी माध्यम असल्याचे त्यांनी नमूद केले.
बुची बाबू सना यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, महिलांविषयी त्यांना नेहमीच आदराची भावना आहे. कोणत्याही महिला पात्राचे वस्तूकरण करणे किंवा त्यांचा अपमान करणे हा त्यांच्या चित्रपटाचा उद्देश नव्हता. मात्र, चित्रपटातील काही दृश्ये प्रेक्षकांना आक्षेपार्ह वाटली असतील, तर त्या भावना ते समजून घेत असून त्यांचा आदर करतात. तसेच या संदर्भात व्यक्त झालेल्या प्रतिक्रिया गांभीर्याने घेत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
याचबरोबर त्यांनी चित्रपटातील वादग्रस्त दृश्यांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती दिली. प्रेक्षकांकडून आलेल्या प्रतिक्रियांचे विश्लेषण केल्यानंतर संबंधित दृश्यांमध्ये आवश्यक बदल केले जातील, असे त्यांनी सांगितले. बदलत्या सामाजिक जाणीवा, संवेदनशीलता आणि प्रेक्षकांच्या अपेक्षा लक्षात घेऊन चित्रपट निर्मात्यांनी जबाबदारीने काम करणे आवश्यक असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. प्रत्येक महिलेला सन्मान, प्रतिष्ठा आणि आदराने पडद्यावर सादर केले जाणे गरजेचे असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
दरम्यान, पेद्दी चित्रपटातील राम चरण आणि जाह्नवी कपूर यांच्या काही रोमँटिक दृश्यांवरून सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे. विशेषतः एका दृश्यात नायिकेच्या संमतीशिवाय तिला चुंबन दिल्याचे दाखवण्यात आल्यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली. त्यानंतर नायिका रडताना दिसत असल्याने या दृश्यावर अधिक टीका झाली. तसेच आणखी एका प्रसंगात काही गुंड नायिकेचा विनयभंग करण्याचा प्रयत्न करताना दाखवण्यात आले आहे. याशिवाय चित्रपटात जाह्नवी कपूरला काही ठिकाणी अतिशय ग्लॅमरस आणि बोल्ड पद्धतीने सादर करण्यात आल्याचा आरोपही अनेक प्रेक्षकांनी केला आहे.
चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर यश मिळत असले तरी या वादामुळे पेद्दी पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. आता दिग्दर्शकांनी बदलांचे आश्वासन दिल्यानंतर प्रेक्षकांची प्रतिक्रिया काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.






