(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
गायक आणि रॅपर यो यो हनी सिंग यांनी शनिवारी, १४ मार्च रोजी इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियम येथे त्यांच्या ‘माय चॅप्टर – इंडिया टूर’ची सुरुवात केली. कॉन्सर्टचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यामध्ये त्यांनी‘देसी कलाकार’, ‘ब्लू आईज’, ‘सनी सनी’, ‘लुंगी डान्स’, ‘मिलियनेअर’, ‘डोप शॉप’ आणि ‘ब्राऊन रंग’ यांसारखी लोकप्रिय गाणी सादर केली. मात्र, वृत्तांनुसार कॉन्सर्टदरम्यान चाहत्यांमध्ये आणि शोच्या प्रायोजक टीममधील काही सदस्यांमध्ये वाद झाला आणि त्यातून मोठी झटापट झाल्यामुळे काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
एका इन्स्टाग्राम हँडलवर शेअर झालेल्या व्हायरल व्हिडिओमध्ये यो यो हनी सिंगच्या कॉन्सर्टदरम्यान प्रायोजक टीममधील सदस्य आणि काही लोकांमध्ये झालेली हिंसक झटापट दिसत आहे. या व्हिडिओमध्ये दोन्ही बाजूंचे लोक एकमेकांना आक्रमकपणे मारहाण करताना दिसत आहेत. गर्दीत गोंधळाचे वातावरण निर्माण झाले असतानाही, गायकाला या भांडणाची कल्पना नसल्यासारखे वाटत होते आणि या सगळ्या गोंधळात गायकाने आपला परफॉर्मन्स सुरूच ठेवला, असेही सांगितले जात आहे.
दिल्ली पोलिसांनी परिस्थितीवर मिळवले नियंत्रण
दिल्ली पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. तसेच अनेक सुरक्षा कर्मचाऱ्यांनी भांडण आणखी वाढू नये म्हणून ते शांत करण्यासाठी मदत केली. दिल्लीतील कार्यक्रमानंतर यो यो हनी सिंगने २१ मार्च रोजी अहमदाबाद येथे, त्यानंतर २८ मार्च रोजी मुंबईमध्ये, ४ एप्रिल रोजी पुणे येथे, ११ एप्रिल रोजी कोटामध्ये, २५ एप्रिल रोजी इंदूर येथे, २ मे रोजी लखनौमध्ये आणि ९ मे रोजी कोलकातायेथे सादरीकरण करणार आहेत. त्यानंतर १६ मे रोजी बंगळूर येथे त्यांच्या या टूरचा समारोप होणार आहे.
हनी सिंग अडकला अडचणीत
या वर्षाच्या सुरुवातीला यो यो हनी सिंगने दिल्लीतील नानकू-करुण यांच्या कॉन्सर्टमध्ये केलेल्या एका वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला होता. मंचावरून बोलताना त्याने थंडीच्या हवामानामुळे अश्लील टिप्पणी केली होती. त्याच्या या वक्तव्यामुळे अनेकांना ते अजिबात पसंत पडले नाही आणि रॅपरने वापरलेल्या शब्दांवर अनेकांनी टीका केली.
तसेच पुढे, १५ जानेवारी रोजी यो यो हनीने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर करून माफी मागितली होती. आपल्या वक्तव्याबद्दल स्पष्टीकरण देताना त्याने म्हटले, “मी त्या शोमध्ये फक्त एक पाहुणा होतो. कॉन्सर्टच्या सुमारे दोन दिवस आधी मी काही स्त्रीरोग तज्ज्ञ आणि लैंगिक आरोग्य तज्ज्ञांसोबत दुपारचे जेवण केले होते. त्या वेळी आमच्यात चर्चा झाली आणि त्यांनी मला सांगितले की तरुण पिढी लैंगिक संसर्गजन्य आजारांमुळे मोठ्या प्रमाणात त्रस्त आहे.”






