(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
बॉलीवूड अभिनेत्री नोरा फतेहीच्या अडचणी आता वाढ झाल्याचे दिसत आहे. तिच्या ‘केडी डेव्हिल’ या कन्नड चित्रपटातील ‘सरके चुनर तेरी सरके’ या गाण्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. या गाण्याच्या हिंदी आवृत्तीत अत्यंत अश्लील शब्द आहेत, ज्यामुळे नोरा फतेही आणि संजय दत्त टीकेचे लक्ष्य बनले आहेत. आता, हे प्रकरण आणखी चिघळू शकते असे वृत्त आहे. वृत्तानुसार, १० वकिलांच्या एका गटाने गृह मंत्रालयाशी संपर्क साधून नोरा फतेहीचा वर्क परमिट रद्द करण्याची मागणी केली आहे. इतकेच नाही, तर या वकिलांनी नोरा फतेहीला भारतातून हद्दपार करण्याचीही मागणी केली आहे. हे अशा वेळी घडत आहे, जेव्हा भारत सरकारने ‘सरके चुनर तेरी सरके’ या गाण्यावर बंदी घातली आहे. राष्ट्रीय महिला आयोगानेही हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे, तर गीतकार रकीब आलम यांनी दिग्दर्शकाला जबाबदार धरले आहे. दिग्दर्शक प्रेम यांनी जबरदस्तीने कन्नड गाण्याचे शब्दशः भाषांतर करून घेतल्याचा आरोप आहे.
माध्यमांच्या वृत्तानुसार, गृह मंत्रालयाव्यतिरिक्त माहिती आणि प्रसारण मंत्रालय, केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळ (CBFC), इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आणि राष्ट्रीय महिला आयोगाकडेही नोरा फतेहीविरोधात तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. मात्र, नोराविरुद्धची ही कारवाई थोडी विचित्र आहे, कारण अभिनेत्रीबद्दल जेवढा गदारोळ झाला आहे, तेवढा चित्रपटाच्या निर्मात्यांबद्दल किंवा गाण्यात दिसलेल्या संजय दत्तबद्दल झालेला नाही.
मात्र, त्यांच्या याचिकेत वकिलांनी असा आरोप केला की, ते गाणे “अत्यंत अश्लील,” लैंगिकदृष्ट्या उत्तेजक आणि सार्वजनिक नैतिकता तसेच महिलांच्या प्रतिष्ठेचा अपमान करणारे आहे. त्यांनी पुढे असा युक्तिवाद केला की, नोरा फतेहीने अशा प्रकारच्या आशयाशी संबंध जोडून भारतात काम करण्याच्या आपल्या विशेषाधिकाराचा गैरवापर केला आहे.
वकिलांनी याचिकेत परदेशी कायदा, १९४६ च्या तरतुदींचाही हवाला दिला असून, ज्या परदेशी नागरिकांच्या कृतींमुळे सार्वजनिक सभ्यता किंवा सुव्यवस्थेला बाधा येऊ शकते, त्यांच्यावर कारवाई करण्याचा अधिकार सरकारला आहे, असे म्हटले आहे. त्यांनी पासपोर्ट (भारतात प्रवेश) कायदा, १९२०, तसेच इतर कायदेशीर तरतुदींचाही हवाला दिला.
याचिकेत असाही दावा करण्यात आला आहे की, ‘सरके चुनर तेरी सरके’ हे गाणे भारतीय दंड संहिता, महिलांचे अश्लील चित्रण (प्रतिबंध) कायदा, १९८६ आणि माहिती तंत्रज्ञान कायदा, २००० यांसारख्या अनेक कायद्यांचे उल्लंघन करते. कायदेशीर चौकटीच्या पलीकडे जाऊन, वकिलांनी असा युक्तिवाद केला की, अशा चित्रणांमुळे अश्लीलतेला प्रोत्साहन मिळते, महिलांना वस्तू म्हणून पाहिले जाते आणि समाजात प्रचलित असलेल्या गैरसमजांना बळकटी मिळते.






