(फोटो सौजन्य - Instagram)
तमिळ सुपरस्टार कमल हसन यांनी अलीकडेच कन्नड भाषेच्या उत्पत्तीवर भाष्य केले आहे. यानंतर ते अडचणीत आले आहेत. अभिनेत्यावर याप्रकरणी टीका होत आहे. याबाबत ‘कर्नाटक फिल्म चेंबर ऑफ कॉमर्स’ ने म्हटले आहे की जोपर्यंत कमल हसन माफी मागत नाहीत तोपर्यंत त्यांचा आगामी चित्रपट ‘ठग लाईफ’ कर्नाटकात प्रदर्शित होणार नाही. दरम्यान, कर्नाटक उच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली आहे, ज्यामध्ये चित्रपटाला कोणत्याही अडथळ्याशिवाय कर्नाटकात प्रदर्शित करण्याची परवानगी मिळावी यासाठी निर्देश मागण्यात आले आहेत. आता याबाबत अभिनेत्याने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
या मागण्या याचिकेत करण्यात आल्या
कमल हसन यांच्या प्रॉडक्शन हाऊस ‘राज कमल फिल्म्स’ ने उच्च न्यायालयात याचिकेत म्हटले आहे की, तामिळनाडू आणि कर्नाटकमधील लोकांमधील एकता आणि परस्पर आदर दाखविण्याच्या उद्देशाने अभिनेत्याची टिप्पणी चुकीच्या पद्धतीने घेण्यात आली. याबाबत आता प्रकरण वाढले आहे. तसेच चित्रपटाबाबत उच्च न्यायालय काय निर्णय देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
कर्नाटकात चित्रपटाच्या प्रदर्शनात अडथळा आणण्यापासून किंवा त्यावर बंदी घालण्यापासून कोणत्याही व्यक्ती, गट किंवा प्रोजेक्टला रोखण्यासाठी निर्देश देण्याची विनंती याचिकाकर्त्याने केली. यासोबतच, त्यांनी चित्रपट निर्माते, कलाकार, थिएटर मालक आणि प्रेक्षकांना ‘धोक्यांपासून किंवा व्यत्ययापासून’ वाचवण्यासाठी सुरक्षा व्यवस्था करण्याची मागणीही केली.
बनावट AI Video वर पंकज त्रिपाठीने व्यक्त केले मत, म्हणाले- ‘मानवी भावनांचे महत्व संपत आहे…’
कर्नाटक संघटनेने आक्षेप व्यक्त केला
‘कर्नाटक फिल्म चेंबर ऑफ कॉमर्स’चे अध्यक्ष एम नरसिंहलू म्हणाले की हा वाद चित्रपटाच्या पलीकडे गेला आहे. ते म्हणाले, ‘जर त्यांनी माफी मागितली नाही तर ‘ठग लाईफ’ कर्नाटकात चालणार नाही. ते उद्योगाबद्दल नाही, तर राज्याबद्दल आहे. त्यांच्या माफीशिवाय चित्रपटाचे प्रदर्शन कठीण आहे. आमचे प्रदर्शक किंवा वितरक ते प्रदर्शित करण्यास तयार नाहीत. येथे चित्रपट कसा प्रदर्शित होऊ शकतो?’ असे ते म्हणाले आहे.
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी आक्षेप घेतला
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी भाषा वादावर प्रतिक्रिया देताना म्हटले की कन्नड भाषेचा स्वतःचा समृद्ध इतिहास आहे आणि हासन यांना ‘त्याबद्दल माहिती नाही.’ कर्नाटक भाजप अध्यक्ष बीवाय विजयेंद्र यांनी या प्रकरणी अभिनेत्याकडून माफी मागण्याची मागणी केली आहे. अनेक कन्नड गट आणि भाषा कार्यकर्त्यांनीही या वादावर आपले मत व्यक्त केले आहे. या लोकांनी अभिनेत्याला माफी मागण्यासही सांगितले आहे. या वादामुळे कर्नाटकात ‘ठग लाईफ’चे थिएटर रिलीज अडचणीत येण्याची शक्यता देखील दर्शवली. येथे प्रदर्शक कोणताही तोडगा न काढता चित्रपट प्रदर्शित करण्यास नाखूष आहेत.
अण्णा, आदित्य, बबली आणि सनी यांचा नवा घोटाळा! ‘ये रे ये रे पैसा ३’ची रिलीज डेट जाहीर
चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान कमल हासन यांनी एक टिप्पणी केली
‘ठग लाईफ’ चित्रपटाच्या प्रमोशनल इव्हेंट दरम्यान कन्नड भाषेचा वाद सुरू झाला. प्रमोशन दरम्यान कमल हसन यांच्यासोबत त्रिशा कृष्णन आणि सिलंबरसन टीआर होते. दक्षिण भारतातील सांस्कृतिक आणि भाषिक संबंधांबद्दल बोलताना हासन यांनी ‘कन्नड भाषेची उत्पत्ती तमिळमधून झाली’ असे विधान केले. हासन यांच्या या विधानावर जोरदार टीका झाली. आणि लोक संतापले.
कमल हसन यांची भूमिका
कन्नड-तमिळ वादावर कमल हासन यांचे विधान कर्नाटकातील लोकांना पसंत पडले नाही. कमल हसन यांनीही या मुद्द्यावर माघार घेण्यास नकार दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की, ‘ही लोकशाही आहे. मी कायदा आणि न्यायावर विश्वास ठेवतो. कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि केरळवरील माझे प्रेम खरे आहे. ज्यांचा अजेंडा आहे त्यांच्याशिवाय कोणीही यावर शंका घेणार नाही. मला यापूर्वी धमक्या देण्यात आल्या आहेत. जर मी चुकीचा असेल तर मी माफी मागेन, जर मी नसेल तर मी माफी मागणार नाही.’ असे अभिनेत्याने स्पष्ट सांगितले आहे.