(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
दोन दशकांहून अधिक काळाच्या कारकिर्दीत, मिका सिंगने असंख्य हिट गाणी दिली आहेत, परंतु असे असूनही, तो पुरस्कार सोहळ्यांपासून दूर राहतो. अलीकडेच, मिका सिंगने पुरस्कार सोहळ्यांपासून दूर राहण्यामागील सत्य उघड केले आहे. या गायकाने त्या वर्षाची आठवणही केली जेव्हा सोनू निगमच्या सुपरहिट गाण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आणि आयुष्मान खुराणाला सर्वोत्कृष्ट संगीत पुरस्कार देण्यात आला. आता या सगळ्याबद्दल गायक नक्की काय म्हणाला हे जाणून घेणार आहोत.
यूट्यूब चॅनलवरील होस्ट शुभंकर मिश्रा यांना दिलेल्या मुलाखतीत मिका सिंगने बॉलिवूड पुरस्कारांबद्दल मोकळेपणाने सांगितले आहे. गायक म्हणाला की, ‘मी अनेक हिट गाणी दिली आहेत पण मला कधीही नामांकन मिळाले नाही. याचे कारण असे की काही वर्षांपूर्वी, २०११ च्या सुमारास, मी एक संदेश दिला होता की कोणतेही गाणे हिट असले तरी… कृपया ते नामांकित करू नका. पंरतु जे गाणं तितकंसं हिट नसतं तरीही ते पुरस्कारांमध्ये जिंकतं तेव्हा खूप वाईट वाटते.’ असं गायक म्हणाला.
आयुष्मान खुरानाच्या विजयावर मिका नाराज
यावर पुढे चर्चा करताना गायक पुढे म्हणाला, ‘सोनू निगम साहेबांचे हे गाणे खूप चांगले होते. ‘अभी मुझ में कहीं’. हे गाणं हिट देखील खूप झाले. तर दुसरीकडे, माझ्या भावासारखा आयुष्मान खुराणा, त्याचे ‘पाणी दा’ हे गाणे आले होते. त्यामुळे आयुष्मानला तो फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. तर आता हे सार्वजनिक आहे की ते विकले गेले आहे की विकत घेतले गेले आहे, मला समजत नाही. पण तो पुरस्कार सोनू निगमच्या नावावर होता. कुठेतरी, पुरस्कार सोहळ्याच्या आयोजकांनी हे देखील लक्षात ठेवले पाहिजे की २-५ गाणी हिट झाली तरी चालेल पण जो दिग्गज आहे त्याचा आदर करा किंवा त्याला अजिबात आमंत्रित करू नका, ते जास्त चांगलं होईल. त्याला फोन करून त्याचा अपमान करून काही उपयोग नाही.’ असं मिका म्हणाला.
शुभमन गिलला नव्हे तर ‘या’ अभिनेत्याला डेट करतेय सारा तेंडुलकर? डेटिंगच्या अफवांनी उडवली खळबळ
हा पुरस्कार सोहळा २०१३ मध्ये झाला आहे. सोनू निगमला २०१३ मध्ये त्यांच्या ‘अभी मुझमे कहीं’ या गाण्यासाठी नामांकन मिळाले होते. त्याच वर्षी, आयुष्मान खुरानाला त्याच्या ‘पानी दा रंग’ या गाण्यासाठी नामांकन मिळाले आणि आयुष्मानने हा पुरस्कार जिंकला. मिका सिंगने त्याच्या शब्दांतून स्पष्ट केले होते की तो याच्याशी सहमत नाही. आणि म्हणूनच तो बॉलिवूड पुरस्कार सोहळ्यात हजेरी लावत नाही.
मिका सिंगनेही निर्मिती क्षेत्रात नशीब आजमावले
या मुलाखतीत, मिका सिंगने संगीत जगात नाव कमावल्यानंतर चित्रपटसृष्टीत प्रवेश करण्याचा अनुभवही शेअर केला. त्याने सांगितले होते की पहिल्या प्रोजेक्टमध्ये करण सिंग ग्रोव्हर आणि बिपाशा बसूसोबत काम करण्याचा त्याचा अनुभव इतका वाईट होता की नंतर त्याने स्वतःला निर्मितीपासून दूर केले.