
Mushtaq Khan : प्रसिद्ध अभिनेते मुश्ताक खान यांचे निधन, कॅन्सरने केला घात
बॉलीवूडमध्ये अनेक गाजलेल्या चित्रपटांत सहकलाकाराची भूमिका साकारणारे मुश्ताक खान (Mushtaq Khan) यांचे गुरुवारी दिर्घ आजारपणामुळे निधन झाले. ते 56 वर्षांचे होते. ‘वेलकम’, ‘आशिकी’, ‘मुझसे शादी करोगी’ आणि ‘हम हैं राही प्यार के’ सारख्या चित्रपटातून आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अभिराज्य गाजवणाऱ्या मुश्ताक खान यांनी जगाचा निरोप घेतला आहे.
प्राथमिक माहितीनुसार, मुश्ताक खान यांच्यावर मागील 15 दिवसांपासून मुंबईच्या नानावटी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांना कॅन्सर होता. जवळपास पाच वर्षांपूर्वी त्यांना कॅन्सर असल्याचे निदान झाले होते. त्यातून ते सावरलेही होते, पण हा आजार पुन्हा त्यांना जडला होता. त्यानंतर त्यांची तब्येत ही दिवसेंदिवस बिघडतच गेली.
मुश्ताक खान यांचे निकटवर्तीय व जीवलग मित्र शिवम यांनी एका हिंदी वृत्तवाहिनीला त्यांच्या निधनाची बातमी दिली. गुरुवारी संध्याकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाच्या बातमीमुळे फिल्म इंडस्ट्री व त्यांच्या चाहत्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
मुश्ताक यांनी चित्रपटांत जास्त करून सहकलाकार आणि विनोदी भूमिका साकारल्या आहेत. ‘वेलकम’ मधील त्यांचा अभिनय आजही प्रेक्षकांच्या मनावर कोरला गेला आहे. त्याशिवाय ‘आशिकी’, ‘मुझसे शादी करोगी’ आणि ‘हम हैं राही प्यार के’सारख्या चित्रपटांतून त्यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली होती. मुश्ताक यांच्यावर 25 तारखेला अंतिमसंस्कार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
मुश्ताक खान हे 2024 मध्ये अत्यंत भितीदायक अशा किडनॅपिंगचा शिकार झाले होते. 20 नोव्हेंबर 2024 रोजी त्यांना मेरठमध्ये एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी बोलावण्यात आलेले. पोलिसांच्या मते, त्यांना दिल्ली विमानतळावरून कारमध्ये बसवण्यात आले व बिजनौरला नेऊन त्यांचे अपहरण करण्यात आले.
काही बातम्यांच्या मते, गुडांनी तब्बल 12 तास त्यांना त्रास दिलेला व 1 कोटींची खंडणी मागितलेली. तेव्हा काही प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मुश्ताक म्हणाले होते की, एखाद्या कलाकाराकडे एवढा पैसा नसतो, हे ऐकताच अपहरणकर्ते थक्क झालेले. त्या गुडांना वाटायचे की, प्रत्येक कलाकार हा गर्भश्रीमंत असतो. सुदैवाने मुश्ताक तेथून पळण्यास यशस्वी झाले होते.