
कर्करुग्णांच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण करणारी संस्था; 'कैनसपोर्ट'कडून मोफत उपचार, घरपोच सेवा अन्...
१९९६ मध्ये सुरू झालेल्या कैनसपोर्ट या ना-नफा संस्थेचे कार्य केवळ आजारावर उपचार करण्यापुरते मर्यादित नाही. गंभीर आजाराचा सामना करणाऱ्या रुग्णांना वेदनामुक्त जीवन जगण्यासाठी मदत करण्याबरोबरच त्यांच्या कुटुंबीयांनाही मानसिक, भावनिक आणि सामाजिक आधार देण्यावर संस्थेचा भर आहे. या कार्याची दखल घेत जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) संस्थेला ‘सार्वजनिक आरोग्य चॅम्पियन पुरस्कार’ देऊन सन्मानित केले आहे. दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश, पंजाब, महाराष्ट्र, हिमाचल प्रदेश आणि झारखंड या सात राज्यांत संस्थेचे काम सुरू असून, पुण्यात २०२५ पासून सेवा दिली जात आहे.
पुण्यात सध्या १३ पथकांद्वारे रुग्णांपर्यंत सेवा पोहोचवली जाते. यामध्ये पाच डॉक्टर, १३ परिचारिका आणि १४ समुपदेशक कार्यरत आहेत. दोन बाह्यरुग्ण विभागांच्या माध्यमातूनही रुग्णांना सुविधा दिल्या जातात. वेदना व अन्य शारीरिक लक्षणांवर डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार, औषधे, परिचारिका सेवा आणि मानसिक व भावनिक समस्यांवर समुपदेशन विनामूल्य केले जाते. आवश्यक तपासण्या, सरकारी आर्थिक योजनांची माहिती आणि उपचारांबाबत मार्गदर्शनही दिले जाते.
रुग्णांना रुग्णालयात येणे शक्य नसल्यास डॉक्टर, परिचारिका, समुपदेशक आणि फिजिओथेरपिस्ट यांचे प्रशिक्षित पथक घरी जाऊन काळजी घेते. याशिवाय बाह्यरुग्ण सेवा, दिवसभराची देखभाल, रुग्णालयांमधील समुपदेशन आणि मोबाइल पॅलिएटिव्ह केअर क्लिनिकच्या माध्यमातूनही मदत केली जाते. रुग्णांची घरी काळजी कशी घ्यावी, औषधे कशी द्यावीत, याचे प्रशिक्षण कुटुंबीयांना दिले जाते. गरजू रुग्णांना पौष्टिक आहार, प्रथिनयुक्त पूरक आहार तसेच काळजीवाहूंना शिवणकाम, हातगाडी यांसारखे लघुउद्योग सुरू करण्यासाठी मदत केली जाते.
मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अंबिका राजवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचे हे कार्य सुरू आहे. रुग्णांनी तयार केलेल्या वस्तूंच्या विक्रीतून मिळणारी रक्कम आणि देणग्यांच्या माध्यमातून या सेवाकार्याला आर्थिक बळ मिळते. म्हणजेच, रुग्णांच्या हातातील कलेतून केवळ सुंदर वस्तूच नव्हे, तर स्वतःसह इतरांच्या आयुष्यात आशेची उमेदही निर्माण होत आहे, अशी भावना संस्थेच्या प्रतिनिधी रेश्मा जाधव (समुपदेशक) आणि प्रिया भाले (परिचारिका) यांनी व्यक्त केली.
मदतीसाठी संपर्क :
– साथ साथ राष्ट्रीय पॅलिएटिव्ह केअर हेल्पलाइन : १८००२०२७७७७
– दूरध्वनी सहाय्य : ९२६६६८२१८२
Ans: कैनसपोर्ट संस्था कर्करोगासह अन्य गंभीर आजारांनी ग्रस्त रुग्णांना उपचार, औषधे, परिचारिका सेवा, समुपदेशन आणि मानसिक आधार विनामूल्य देते.
Ans: रुग्णांना डॉक्टरांचा सल्ला, औषधे, घरपोच वैद्यकीय सेवा, फिजिओथेरपी, पौष्टिक आहार आणि कुटुंबीयांना रुग्णसेवेचे प्रशिक्षण दिले जाते.
Ans: मदतीसाठी साथ साथ राष्ट्रीय पॅलिएटिव्ह केअर हेल्पलाइन १८००२०२७७७७ किंवा ९२६६६८२१८२ या क्रमांकावर संपर्क साधता येईल.