(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)
‘अफरातफरी’चे दिग्दर्शक मिलिंद कवडे आणि त्यांची टीम सध्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. याचदरम्यान एका मुलाखतीत त्यांनी ओंकारच्या प्रमोशनमधील सहभागाबाबत नाराजी व्यक्त केली. ओंकारकडून फोनला प्रतिसाद मिळत नसल्याचा दावा करत त्यांनी त्याच्या व्यावसायिक वागणुकीवर प्रश्न उपस्थित केले.
या आरोपांवर प्रतिक्रिया देताना ओंकार भोजनेने ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’शी संवाद साधला. तो म्हणाला, “मी यापुढे सिनेमाच्या प्रमोशनल इव्हेंटमध्ये सहभागी होणार आहे. मी त्यांच्या टीमसोबत, ईपींसोबत संपर्कात आहे. दिग्दर्शक असं का म्हणाले हे मला माहिती नाही, पण यावर मी नक्कीच उत्तर देईन.”
ओंकारच्या या वक्तव्यानंतर ‘अफरातफरी’च्या प्रमोशनमध्ये तो सहभागी होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, दिग्दर्शकांनी केलेल्या आरोपांवर तो सविस्तर काय उत्तर देतो, याकडे आता लक्ष लागले आहे.Onkar Bhojane On Milind Kawde
मिलिंद कवडेंचा ओंकारवर आरोप
दरम्यान, मिलिंद कवडे यांनी मुलाखतीत दावा केला की, ओंकारला जून महिन्यातच चित्रपट ऑक्टोबरमध्ये प्रदर्शित होणार असल्याची माहिती देण्यात आली होती. त्यानंतर प्रमोशनसाठी त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र त्याच्याकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याचे कवडे यांनी सांगितले.
“ओंकार एवढा बिझी आहे की तो कोणाचेही फोन उचलत नाही. आम्हा तिघांचेही त्याने फोन उचलले नाहीत. कॉल केल्यानंतर त्याचा एकच मेसेज येतो, ‘दादा मी तुला कॉलबॅक करतो.’ गेल्या चार महिन्यांपासून हेच सुरू आहे,” असं मिलिंद कवडे यांनी सांगितलं.
या अनुभवामुळे भविष्यातील चित्रपटांमध्ये ओंकारसोबत काम न करण्याचा निर्णय घेतल्याचेही मिलिंद कवडे यांनी स्पष्ट केले.
“आता मी कानाला खडा लावला आहे. मी पुढच्या चित्रपटात ओंकारला अजिबात घेणार नाही. मी आतापर्यंत खूप काम केलं आहे, पण या सगळ्यात तो खूप अनप्रोफेशनल आहे. दिग्दर्शकाचा फोन न उचलणं, निर्मात्यांचा फोन न उचलणं, EP ला गंडवणं आणि सतत येतो-येतो म्हणणं… याला अनप्रोफेशनलच म्हणतात,” असा दावा कवडे यांनी केला.
दरम्यान, ओंकारने आपण चित्रपटाच्या टीमच्या संपर्कात असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंच्या वक्तव्यांमुळे ‘अफरातफरी’च्या प्रमोशनवरून सुरू झालेला हा वाद सध्या चर्चेत आहे..






