
Ram Gopal Varma : 'त्या' हिंसक हल्ल्यानंतर 'ॲनिमल' चित्रपटाची चर्चा; राम गोपाल वर्मा म्हणाले, चित्रपटांना दोष कशाला?
आंध्र प्रदेशातील एका शाळेत विद्यार्थिनीवर चेन सॉने (इलेक्ट्रिक करवत) हल्ला झाल्याच्या धक्कादायक घटनेनंतर चित्रपटांमधील हिंसाचाराचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या पार्श्वभूमीवर चित्रपट निर्माता राम गोपाल वर्मा (Ram Gopal Varma) यांनी चित्रपटांमधील हिंसक दृश्यांवर होणाऱ्या टीकेला उत्तर दिले आहे. समाजातील वाढत्या हिंसाचारासाठी चित्रपटांना जबाबदार धरणे चुकीचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केलं आहे.
राम गोपाल वर्मा यांनी रविवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, हिंसाचार वाढण्यासाठी चित्रपटांना दोष देणं म्हणजे अपहरणाच्या घटना वाढल्याबद्दल रामायणाला दोष देण्यासारखे असल्याचं वादग्रस्त विधानही त्यांनी यावेळी केलं.
आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातील रापताडू येथे शाळेच्या वर्गात घुसून एका तरुणाने विद्यार्थिनीवर चेन सॉने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. हेमंत नावाच्या २१ वर्षीय तरुणाने दहावीला शिक्षण घेत असलेल्या एका १५ वर्षीय विद्यार्थिनीवर हल्ला केला. तिला वाचवण्याचा प्रयत्नात त्या विद्यार्थीनीची मैत्रिणही जखमी झाली आहे.
पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, आरोपी संबंधित विद्यार्थिनीचा बऱ्याच काळापासून पाठलाग करत होता. त्याने दिलेला प्रेमाचा प्रस्ताव विद्यार्थिनीने नाकारल्यामुळे त्याने हा हल्ला केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. जखमी विद्यार्थिनीवर बंगळुरू येथील मणिपाल रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे.
या घटनेनंतर सोशल मीडियावर दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांच्या ‘ॲनिमल’ चित्रपटाची चर्चा सुरू झाली आहे. रणबीर कपूरची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटातील एका दृश्यावरून नेटकऱ्यांनी टीका केली आहे. या दृश्यात रणबीर कपूर हातात भरलेली बंदूक घेऊन शाळेच्या वर्गात प्रवेश करताना दिसतो.
या घटनेनंतर चित्रपटांमधील हिंसक दृश्यांचा तरुणांच्या मानसिकतेवर काय परिणाम होतो, यावर सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. काही नेटकऱ्यांनी चित्रपटांमधील हिंसाचाराचे उदात्तीकरण केल्याबद्दल निर्माते आणि कलाकारांना जबाबदार धरण्याची मागणी केली आहे.
एका सोशल मीडिया युजरने चित्रपटांमधील हिंसा आणि अपप्रचार यापूर्वी उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांचा उल्लेख करत अशा दृश्यांच्या परिणामांवर गंभीर चर्चा होण्याची गरज व्यक्त केली. तर दुसऱ्या युजरने ‘ॲनिमल’मधील शाळेच्या वर्गात बंदूक घेऊन प्रवेश करण्याच्या दृश्याचा संदर्भ देत चित्रपट निर्मात्यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले.
दरम्यान, राम गोपाल वर्मा हे संदीप रेड्डी वांगा यांचे चांगले मित्र म्हणून ओळखले जातात. त्यांनी यापूर्वीही संदीप यांच्या चित्रपट निर्मितीच्या शैलीचे आणि त्यांच्या कामाचे सार्वजनिक व्यासपीठांवर कौतुक केले आहे. विशेष म्हणजे संदीप रेड्डी वांगा हेही राम गोपाल वर्मा यांना आपला आदर्श मानतात.
या शाळेतील हल्ल्याच्या घटनेनंतर आरोपीचा शोध घेऊन त्याला धर्मावरम येथे ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे चित्रपटांमधील हिंसाचार आणि त्याचा समाजावर होणारा संभाव्य परिणाम याबाबतची चर्चा पुन्हा एकदा ऐरणीवर आली आहे.
Ans: समाजातील हिंसाचार वाढण्यासाठी चित्रपटांना दोष देणे चुकीचे असल्याचे मत राम गोपाल वर्मा यांनी व्यक्त केले.
Ans: अनंतपूर जिल्ह्यातील रापताडू येथे २१ वर्षीय तरुणाने शाळेच्या वर्गात घुसून १५ वर्षीय विद्यार्थिनीवर चेन सॉने हल्ला केला. तिला वाचवण्याचा प्रयत्न करणारी आणखी एक विद्यार्थिनीही जखमी झाली.
Ans: णबीर कपूरची प्रमुख भूमिका असलेल्या संदीप रेड्डी वांगा यांच्या 'ॲनिमल' चित्रपटातील शाळेच्या वर्गात बंदूक घेऊन प्रवेश करण्याच्या दृश्याची चर्चा सुरू झाली.