
आशिष शेलार यांची मोठी घोषणा
महाराष्ट्र कला अकादमीच्या प्रभादेवी येथील रविंद्र नाट्यमंदिरात ,सांस्कृतिक कार्य विभागाच्या महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळातर्फे आयोजित दर्जेदार चित्रपटांना अर्थसहाय्य योजनेचा धनादेश वितरण सोहळा, गणेशोत्सव रिल्स स्पर्धा पारितोषिक वितरण समारंभ आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज चित्रपटाचे पोस्टर अनावरण या कार्यक्रमात सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार बोलत होते. यावेळी सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील, सह व्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर,चित्रपट सृष्टीतील कलाकार ,दिग्दर्शक, यासह पुरस्कार विजेते उपस्थित होते.
‘अखंडा 2’चित्रपटाच्या रिलीजमध्ये अडथळा, रिलीजच्या २४ तास आधी शो रद्द, चाहते नाराज!
काय म्हणाले आशिष शेलार?
आशिष शेलार म्हणाले की, चित्रपट हा फक्त मनोरंजन देणारा प्रयोग नाही; तो समाजाच्या मनाशी थेट संवाद साधणारे, विचार जागवत राहणारे शक्तिशाली माध्यम आहे. स्त्री-समानता, जातीय समता, पर्यावरण, ग्रामीण जीवन, नवउद्योग या असंख्य विषयांवर मराठी आणि भारतीय चित्रपटांनी गेल्या दशकांत जनजागृती केली आहे.फिल्म सिटीचा अंतिम आराखडा मंजूर झालेला आहे. फिल्म सिटीच्या धर्तीवर महाराष्ट्रातच अद्यावत ऑडिओ व्हिज्युअल गेमिंग सेंटर मुंबईत उभा करणार आहोत असेही ते म्हणाले.
पुढे त्यांनी सांगितले की, ‘आज ५० चित्रपटांत – राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित 4 चित्रपट, राज्य पुरस्काराने गौरवलेले 3 चित्रपट, ‘अ’ दर्जा प्राप्त 10 चित्रपट, ‘ब’ दर्जा प्राप्त 23 आणि ‘क’ दर्जा प्राप्त 10 चित्रपटांचा समावेश आहे. या सर्व चित्रपटांना मिळून एकूण सुमारे 14 कोटी 62 लाख रुपयांचे अर्थसहाय्य आज आपण वितरित करीत आहोत. या योजनेकरिता मूल्यांकन प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडणाऱ्या परीक्षक समितीचेही मी मनःपूर्वक आभार मानतो.’ WAVES २०२५ या जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल समिटमधून महाराष्ट्राने “क्रिएटीव्ह इकॉनॉमी हब” होण्याचा ठोस निर्धार व्यक्त केला आहे.
पुढील पिढ्यांपर्यंत इतिहास पोहचवावा
यावेळी शेलार म्हणाले की, महाराष्ट्राला संत-महात्मे, क्रांतिकारक, समाजसुधारक, विचारवंत, कलावंत, खेळाडू यांचा समृद्ध वारसा लाभला आहे. अशा महनीय व्यक्तींच्या जीवनकार्याची ओळख पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवणे हे आपले कर्तव्य आहे; म्हणूनच शासन विविध क्षेत्रातील थोर व्यक्तिमत्त्वांच्या जीवनावर आधारित चरित्रपट निर्मितीची योजना राबवत आहे.
याच योजनेंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाची निर्मिती सुरू आहे आणि आज या चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण येथे संपन्न होत आहे, ही अत्यंत आनंदाची बाब आहे त्यांच्या कार्याची माहिती नव्या पिढीला होण्यासाठी हा चित्रपट नक्कीच मार्गदर्शक ठरेल असेही ते म्हणाले. यावेळी महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांनी प्रास्ताविक केले तर.सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांनी विभागाच्या योजना व नावीन्यपूर्ण उपक्रम यांची माहिती दिली. दर्जेदार चित्रपटांना अर्थसहाय्य योजनेचा धनादेश वितरण सोहळा पार पडला. गणेशोत्सव रिल्स स्पर्धा पारितोषिक वितरण केल्यानंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज चित्रपटाचे पोस्टर अनावरण करण्यात आले.
आर्यन खान विरोधात पोलिसांत तक्रार दाखल, पबबाहेर केली ‘ती’कृती, सोशल मीडियावर Video व्हायरल