पुणे: ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांचं आज वयाच्या ७७ व्या वर्षी निधन झालं आहेगेल्या १५ दिवसांपासून (Pune) दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात (Dinanath Mangeshkar Hospital) विक्रम गोखले मृत्यूशी झुंज देत होते. आज त्यांची प्राणज्योत मालवली.
[read_also content=”Breaking : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचं निधन; पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास https://www.navarashtra.com/movies/veteran-actor-vikram-gokhale-passes-away-at-dinanath-mangeshkar-hospital-in-pune-nrvb-347753.html”]
विक्रम गोखले यांनी आजवर अनेक सिनेमांमध्ये, नाटकांमध्ये आणि मालिकांमध्येही काम केलं. जितेंद्र जोशीचा ‘गोदावरी’ हा विक्रम गोखलेंनी अभिनय केलेला अखेरचा सिनेमा ठरला आहे. या चित्रपटामध्ये त्यांनी जितेंद्र जोशींच्या आजोबांची भूमिका निभावली होती. संपूर्ण चित्रपटामध्ये त्यांचा ‘मारुतीच्या पायाला पाणी लागलं ?’ हा डायलॉग मनाला काहूर लागलेल्या आणि गोदावरीच्या पूरामुळे हाल झालेल्या माणसाचे वर्णन करणारा आहे. याशिवाय स्टार प्रवाहवरील ‘तुझेच मी गीत गात आहे’ ही त्यांनी काम केलेली अखेरची मालिका ठरली आहे.
विक्रम गोखले यांना अभिनयाचा वारसा त्यांच्या कुटुंबाकडून मिळाला. त्यांची पणजी दुर्गाबाई कामत या भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिल्या अभिनेत्री होत्या. तर त्यांचे वडील चंद्रकांत गोखले हे मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते होते.
‘स्वामी’ हे विक्रम गोखले यांचे पहिलं गाजलेलं व्यावसायिक नाटक होतं. अभिनयासोबत त्यांनी अनेक नाटकांचे दिग्दर्शन देखील केलं. ‘नकळत सारे घडले’, ‘महासागर’, ‘समोरच्या घरात’ ही त्यांची नाटकं गाजली. ‘अकेला’, ‘ईश्वर’, ‘हम दिल दे चुके सनम’, ‘घर आया मेरा परदेसी’ या हिट हिंदी चित्रपटांमध्ये देखील त्यांनी काम केलं. तसंच ‘या सुखांनो या’, ‘अग्निहोत्र’, ‘संजीवनी’ , ‘सिंहासन’ या मालिकामधील विक्रम गोखले यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. ‘नटसम्राट’, ‘माहेरची साडी’ , ‘वजीर’ हे त्यांचे मराठी चित्रपट लोक आजही आवडीनं बघतात.
काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या गोदावरी या चित्रपटामध्ये विक्रम गोखले यांनी महत्वाची भूमिका साकारली. या चित्रपटामध्ये विक्रम गोखले यांच्याबरोबरच जितेंद्र जोशी, अभिनेत्री गौरी नलावडे, अभिनेता संजय मोने यांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. याशिवाय ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेत त्यांनी पंडीत मुकुल नारायण नारायण ही भूमिका साकारली होती. ही त्यांनी काम केलेली अखेरची मालिका होती.