संग्रहित फोटो
पुणे : राज्यासह देशभरात फसवणुकीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. दररोज सायबर चोरटे नागरिकांच्या लाखो रुपयांवर डल्ला मारत आहेत. अशातच आता शेअर ट्रेडिंगच्या माध्यमातून सायबर चोरट्यांनी दोघांची तब्बल ५० लाख ४४ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. गेल्या काही महिन्यांपासून शेअर ट्रेडिंगमधील गुंतवणूकीवर जादा परतावा देण्याच्या आमिषाने चोरटे फसवणूक करत आहेत. फसवणुकीचे सत्र सातत्याने सुरूच असल्याचे देखील यावरून दिसत असून, पोलिसांकडून जनजागृती केली जात असताना नागरिक या आमिषांना बळी पडत असल्याचेही दिसत आहे.
याप्रकरणी पहिल्या घटनेत नांदेडसिटी पोलिस ठाण्यात ४७ वर्षीय व्यक्तीने तक्रार दाखल केली आहे. त्यानूसार, अज्ञात चोरट्यांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. हा प्रकार ८ ते ३१ जुलै २०२५ या कालावधीत घडला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार सिंहगड रोड परिसरात राहण्यास आहेत. त्यांना सायबर चोरट्यांनी ऑनलाईनच्या माध्यमातून संपर्क साधला. तसेच, त्यांना शेअर ट्रेडिंग केल्यानंतर चांगला परतावा मिळेल असे सांगितले. त्यांना काही माहिती देऊन विश्वास संपादन केला. नंतर त्यांना वेगवेगळ्या शेअरमध्ये गुंतवणूकीसाठी म्हणून त्यांच्याकडून केवळ २३ दिवसात एकूण ३४ लाख ९५ हजार रुपये घेतले. मात्र, त्यांना परतावा किंवा गुंतवलेली रक्कम न देता त्यांची फसवणूक केली. अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक अतुल भोस करत आहेत.
दुसऱ्या घटनेत देखील अशाच पद्धतीने ३६ वर्षीय व्यक्तीला सायबर चोरट्यांनी १५ लाख ५० हजार रुपयांना गंडा घातला आहे. हा प्रकार २५ मार्च ते १४ मे या कालावधीत घडला आहे. याप्रकरणी हडपसरमधील व्यक्तीने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यांना शेअर ट्रेडिंगमधील गुंतवणूकीवर चांगला परतावा देण्याचे आमिष दाखविण्यात आले होते. अधिक तपास पोलिस निरीक्षक अश्विनी जगताप या करत आहेत.