४ वर्षांत ३ वेळा गर्भवती! तुरुंगात जाऊ नये म्हणून महिलेने लढवली शक्कल पण...असे उघड झाले (फोटो सौजन्य-X)
गर्भधारणा हा असा काळ आहे ज्यामध्ये महिलांना विशेष काळजी घेण्याची आवश्यकता असते. त्यामुळे अनेक देशांमध्ये याबद्दल वेगवेगळे कायदे बनवण्यात आले आहेत. अनेकदा डॉक्टर म्हणतात की, निरोगी मुलाला जन्म देण्यासाठी, मागील आणि पुढील गर्भधारणेमध्ये १८ ते २४ महिन्यांचे अंतर असले पाहिजे. मात्र असे काही लोक आहेत ज्यांनी या गोष्टींकडे दुर्लक्ष केले आणि फक्त स्वतःच्या फायद्याचा विचार केला आणि ४ वर्षांत तीन मुलांची आई बनली. जेव्हा ही बातमी व्हायरल झाली तेव्हा मात्र सर्वांनाच आश्चर्यचा धक्का बसला.
हे प्रकरण चीनच्या शांक्सी प्रांतातील आहे. जिथे २०२० मध्ये चेन होंग नावाच्या महिलेला ५ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. परंतु ही शिक्षा टाळण्यासाठी ती दरवर्षी गर्भवती राहिली. खरंतर, चीनच्या कायद्यानुसार जर एखादी महिला गर्भवती असेल किंवा बाळाला स्तनपान देत असेल, तर तिला तुरुंगात टाकण्याऐवजी तिला घरीच शिक्षा भोगण्याची परवानगी आहे. चेनने याचा फायदा घेतला आणि शिक्षा टाळण्यासाठी प्रत्येक वेळी गर्भवती राहायची. जेणेकरून ती तिची तुरुंगवासाची शिक्षा पुढे ढकलू शकेल.
मे महिन्यात नियमित तपासणी दरम्यान अधिकाऱ्यांना आढळले की, तिने तिसऱ्या मुलाला जन्म दिला आहे. परंतु त्या मुलाची नोंदणी तिच्या मेहुणीच्या नावावर आहे. याचा अर्थ कागदावर ते मूल तिच्या मेहुणीचे होते. यानंतर तपास सुरू झाला आणि चेनला असे आढळून आले की तिचा घटस्फोट झाला आहे. तिची पहिली दोन मुले तिच्या माजी पतीसोबत राहतात, तर तिने तिसरे मूल तिच्या माजी पतीच्या बहिणीला दिले.
अशा परिस्थितीत, अधिकाऱ्यांना संशय आला की चेन होंग जाणूनबुजून गर्भवती राहून शिक्षा टाळण्यासाठी मार्ग अवलंबत आहे. त्यानंतर तिला आता तुरुंगात पाठवण्याची शिफारस करण्यात आली, कारण तिच्या पाच वर्षांच्या शिक्षेला एक वर्षापेक्षा कमी वेळ शिल्लक होता, त्यामुळे तिला थेट तुरुंगात पाठवण्याऐवजी, तिला उर्वरित शिक्षा भोगता यावी म्हणून एका डिटेंशन सेंटरमध्ये ठेवण्यात आले.
अधिकाऱ्यांनी तिच्यासोबत बसून कायदा समजावून सांगितला आणि स्पष्ट केले की तिला आता तिच्या कायदेशीर जबाबदाऱ्या पाळाव्या लागतील. चेन हाँगचा खटला पहिला नाही, याआधी झेंग नावाच्या महिलेने अशीच पद्धत अवलंबली होती. २००५ मध्ये भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तिला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती, परंतु तिने दहा वर्षांत एकूण १४ गर्भधारणेचा दावा केला होता, त्यापैकी १३ खऱ्या असल्याचे आढळून आले.