पुण्यात बेशिस्त वाहतुकीवर नियंत्रण गरजेचे (फोटो- istockphoto)
पुणे/चंद्रकांत कांबळे: शहरात वाढती वाहतूक, नियमभंग करणारे वाहनचालक आणि वारंवार होणारे अपघात हे मोठे आव्हान ठरत आहेत. या पार्श्वभूमीवर प्रादेशिक परिवहन अधिकारी (आरटीओ) अर्चना गायकवाड यांनी ‘नवराष्ट्र’शी खास संवाद साधला. त्यांनी वाहतूक शिस्त राखण्यासाठीचे प्रयत्न, नियम मोडणाऱ्यांवरील कारवाई, विद्यार्थ्यांसाठी रस्ता सुरक्षा धडे, स्कूल बस तपासणी, तसेच आरटीओकडून सुरू असलेल्या नवीन प्रकल्पांबाबत या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे दिली.
प्रश्न: पुणे शहरात मोठ्या प्रमाणात बेशिस्त वाहतूक आहे. यावर नियंत्रण आणण्यासाठी आरटीओकडून कोणत्या स्वरूपाचे प्रयत्न केले जात आहेत?
उत्तर: वाहतूक शिस्त राखणे ही प्रत्येक नागरिकांची जबाबदारी आहे. गाडी चालवताना नियम पाळणे हे चालकाचे कर्तव्य आहे. प्रत्येक गोष्टीसाठी आरटीओ किंवा पोलिसांवर जबाबदारी ढकलणे योग्य नाही. आरटीओ आपले काम करत आहे, मात्र गाडी चालवणाऱ्यांनी स्वतःहून ठरवून शिस्त पाळली तरच सुरक्षित आणि व्यवस्थित प्रवास शक्य आहे.
प्रश्न: नियम मोडणाऱ्या वाहन चालकांवर ‘ऑन द स्पॉट’ दंड आकारणीसाठी कोणती यंत्रणा वापरली जाते?
उत्तर: ई-चलानच्या माध्यमातून कारवाई केली जाते. नियम मोडल्यास त्यांच्यावर दंड आकारला जातो. तो दंड तत्काळ किंवा त्यांच्या सोयीनुसार नंतर भरता येतो.
प्रश्न: दहा लाख विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षेचे धडे देण्याचे महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविण्याची कल्पना कशी सुचली?
उत्तर: एखाद्या अपघातात तीनपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाल्यास विभागप्रमुखांनी घटनास्थळी जाऊन तपास करावा लागतो. अनेक अपघात पाहताना मी विचार केला की, असे अपघात होऊ नयेत यासाठी आपण काय करू शकतो? शाळेत शिकवलेली गोष्ट कायम लक्षात राहते, म्हणून विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षेचे धडे द्यावेत असे ठरवले. जेव्हा हे विद्यार्थी १८ वर्षांचे होऊन वाहन परवाना घेतील, तेव्हा त्यांना रस्ता सुरक्षा नियमांचे महत्त्व समजलेले असेल. यामुळे स्वअनुशासन पाळणारे वाहनचालक घडतील.
प्रश्न: रस्ता सुरक्षा प्रशिक्षणाला प्रत्यक्षात कधी सुरुवात होणार आहे?
उत्तर: यासाठी आपण जून महिन्यातच सुरुवात करणार होतो, पण पावसामुळे आणि आषाढी वारीमुळे ते पुढे ढकलावे लागले. आता लवकरच प्रत्यक्ष सुरुवात होईल. शनिवारी दप्तरविरहित शाळांच्या उपक्रमात दिवे घाट येथे ६ हजार झाडे लावली आहेत. या निसर्गरम्य वातावरणात विद्यार्थ्यांना रोड सेफ्टीचे धडे दिले जातील. यामध्ये रोड सेफ्टीविषयी व्हिडिओ दाखवले जातील, चित्रकला स्पर्धा, सुविचार पोस्टर्स, तसेच सापशिडीच्या माध्यमातून संदेश दिले जातील. शाळेच्या बस चालकांनाही आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याचे प्रशिक्षण दिले जाईल. ॲम्बुलन्स किंवा फायर ब्रिगेडसारख्या आपत्कालीन वाहनांना प्राधान्य कसे द्यावे हेही शिकवले जाणार आहे.
प्रश्न: स्कूल बस आरटीओचे नियम पाळतात का? तपासणी किती वेळा केली जाते?
उत्तर: स्कूल बसची तपासणी वेळोवेळी केली जाते. शाळा सुरू होण्याआधी मे महिन्यात एकदा तपासणी होते. तसेच सुट्टीच्या दिवशी शनिवारी-रविवारीही गाड्यांची तपासणी सुरूच असते. नियमावलीनुसार स्कूल बस असणे अत्यावश्यक आहे जो नियमांचा भंग करतो त्यांच्यावर दंडात्मक करवाई केली जाते.
प्रश्न: आपल्या विभागात नवीन कोणते प्रकल्प सुरू आहेत?
उत्तर: आळंदी रोड, हडपसर, दिवे घाट येथे तीन ठिकाणी ऑटोमॅटिक ड्रायव्हर टेस्टिंग ट्रॅक (एडीटीटी) सुरू करण्याचे काम चालू आहे. तसेच दिवे घाट येथे गाड्यांच्या पासिंगसाठी (आयएनसी) सेंटर ही सुरू होत आहे. यामुळे वाहनचालकांना पक्का परवाना मिळवण्यासाठी लांबचा प्रवास करावा लागणार नाही. आमच्या विभागामार्फत हे नवीन प्रकल्प राबवले जात आहेत.