गाणं गाताना हॉलिवूड रॅपर स्टेजवरच कोसळला, उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास
Rapper Fatman Scoop Passed Away : हॉलिवूड इंडस्ट्रीतून एक दु:खद बातमी येत आहे. जगप्रसिद्ध अमेरिकन रॅपर फॅटमन स्कूप याचं निधन झालं आहे. वयाच्या ५३ व्या वर्षी रॅपरचं निधन झालं आहे. रॅपरच्या निधनाचं वृत्त त्याच्या कुटुंबीयांनी आणि त्याच्या मॅनेजरने शनिवारी सकाळी इंग्रजी माध्यमांना दिले.
५३ वर्षीय रॅपर फॅटमन स्कूप शुक्रवारी रात्री कनेक्टिकटमधील हॅमडेन टाऊन सेंटर पार्कमध्ये एका इव्हेंटमध्ये परफॉर्मन्स सादर करत होता. परफॉर्मन्स सादर करतानाच रॅपर अचानक पडला आणि लगेचच तो बेशुद्ध पडला. घटना घडताच त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण त्याचे उपचारादरम्यान निधन झाले. ५३ वर्षीय रॅपरच्या निधनाचे वृत्त ऐकून अमेरिकेतल्या हिप हॉप इंडस्ट्रीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
हे देखील वाचा – बॉलिवूड पाहून आलाय कंटाळा? मग हा घ्या हॉलिवूडचा खजाना
एका अमेरिकन वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, रॅपर फॅटमन ज्या इव्हेंटमध्ये गाणं गात होता. त्या इव्हेंटमधील व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये फॅटमन स्टेजवर गाणं गात होता. गाणं गात असतानाच अचानक त्याला त्याच्या छातीत दुखू लागलं आणि तो खाली जमिनीवर आदळला. या घटनेत रॅपर बेशुद्ध अवस्थेत होता. लगेचच त्याच्या मदतीसाठी तेथील उपस्थित मेडिकल टीमही होती. मेडिकल टीमने फॅटमनला सीपीआर देण्याचा प्रयत्न केला, पण काही झालं नाही.
लगेचच प्रसिद्ध रॅपरला रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्याला वाचवण्याचे अनेक प्रयत्न केले. पण त्यांचे सर्व प्रयत्न असफल ठरले. असं अचानक रॅपर फॅटमनच्या निधनाने त्याच्या कुटुंबीयांवर, मित्र मंडळींवर आणि चाहत्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. फॅटमनने आपल्या करियरमध्ये ‘बी फेथफुल’ आणि ‘इट टेक्स्ट स्कूप’ हे दोन हिट गाणी गायले होते. या शिवाय, फॅटमनचे अनेक गाणे आजही युट्यूबवर चाहते ऐकत असतात. त्याच्या गाण्यांची जोरदार चाहत्यांमध्ये चर्चा होते.
फॅटमनच्या कुटुंबीयांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत वृत्त दिले की, “आम्हाला सांगताना अत्यंत दु:ख होत आहे की, फॅटमॅन स्कूप आता आपल्यात राहिलेला नाही. फॅटमन स्कूपला क्लबचा आवाज म्हणून संपूर्ण जगाने ओळखले. त्यांच्या म्युझिकने प्रत्येकाला थिरकण्याची आणि जीवन सकारात्मकतेने जगण्याची प्रेरणा दिली.” हॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींनी फॅटमनला श्रद्धांजली वाहिली. १९९९ मध्ये रिलीज झालेल्या ‘बी फेथफुल’ या हिट गाण्यासाठी फॅटमन स्कूप ओळखले जातो. परंतु त्याला २००३ मध्ये जगभरात प्रसिद्धी मिळाली. २००४ मध्ये फॅटमनने यूके टेलिव्हिजन सीरीयल ‘चान्सर्स’ मध्ये काम केलं होतं. शिवाय, २०१५ मध्ये फॅटमनने ‘बिग ब्रदर 16: UK vs USA’ या सेलिब्रिटी शोमध्येही सहभाग घेतला होता.