(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
ब्रेंट हिंड्स हे अमेरिकन संगीत विश्वातील एक प्रसिद्ध नाव आहे. हेवी मेटल बँड मास्टोडॉनचे एक्स गायक आणि गिटारवादक आणि ग्रॅमी पुरस्कार विजेते ब्रेंट हिंड्स यांचे वयाच्या ५१ व्या वर्षी निधन झाले आहे. या दुःखद बातमीने सर्वांनाच धक्का बसला आहे. या एक्स गायकाचे रस्ते अपघातात निधन झाले, अशी माहिती त्यांच्या बँड सदस्यांनी दिली आहे. या घटनेने मनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे. तसेच हा मोठा अपघात झाला असून, चाहते त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत.
ब्रेंट हिंड्स यांच्या मृत्यूचे कारण?
ब्रेंट हिंड्स यांच्या मृत्यूची बातमी त्यांच्या बँड सदस्यांनी दिली आहे. तसेच, अटलांटा पोलिसांच्या म्हणण्यानुसार, बुधवारी रात्री उशिरा हार्ले-डेव्हिडसन मोटरसायकल चालवताना गायकाचा मृत्यू झाला. बीएमडब्ल्यू एसयूव्ही चालक रस्त्यावर वळण घेत असताना ही घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ब्रेंट हिंड्स घटनास्थळीच बेशुद्ध झाले. आणि त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
गायक-गिटारवादकांच्या बँडने व्यक्त केला शोक
ही दुःखद घटना उघडकीस येताच, दिवंगत ब्रेंट हिंड्सच्या बँडने सोशल मीडियाद्वारे शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले, ‘आम्हाला खूप दुःख आणि धक्का बसला आहे आणि एका प्रतिभावान कलाकाराच्या जाण्याचे दुःख अजूनही विसरण्याचा प्रयत्न करत आहोत. एक अशी व्यक्ती ज्याच्यासोबत आपण इतके यश, कामगिरी आणि इतक्या लोकांच्या हृदयाला स्पर्श करणारे संगीत निर्माण केले.’ असे लिहून या कलाकाराला बँड सदस्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
ब्रेंट हिंड्स कोण होते?
ब्रेंट हिंड्सचा जन्म १६ जानेवारी १९७४ रोजी अमेरिकेतील हेलेना येथे झाला. विल्यम ब्रेंट हिंड्स हा एक अमेरिकन संगीतकार होता, जो अटलांटा हेवी मेटल बँड मास्टोडॉनचा मुख्य गिटारवादक म्हणून ओळखला जातो. मास्टोडॉनचे दोन अल्बम खूप प्रसिद्ध झाले, त्यापैकी एक २०१७ मध्ये “एम्परर ऑफ सँड” आणि दुसरा २०१४ मध्ये आलेला “वन्स मोअर राउंड द सन” आहे. तसेच, ब्रेंटने मार्च २०२५ मध्ये बँड सोडला. त्यांच्या जाण्याचे कोणतेही कारण देण्यात आले नव्हते. तसेच, बँडने म्हटले होते की त्यांनी परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता.