
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
RJ Mitte Death: हॉलिवूडमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जगभरात लोकप्रिय ठरलेल्या ‘ब्रेकिंग बॅड’ या गाजलेल्या मालिकेत वॉल्टर व्हाईट ज्युनियरची भूमिका साकारून घराघरांत पोहोचलेला अभिनेता आरजे मिट्टे याचे वयाच्या अवघ्या ३४व्या वर्षी निधन झाले आहे. टेक्सासमधील ब्राऊन्सव्हिल येथे त्याने अखेरचा श्वास घेतला. त्याच्या निधनाच्या वृत्ताने चाहत्यांसह मनोरंजनविश्वातून हळहळ व्यक्त केली जात आहे
आरजे मिट्टेच्या टीमने ‘द हॉलीवूड रिपोर्टर’ला दिलेल्या निवेदनातून त्याच्या निधनाची माहिती दिली. “आम्ही अत्यंत दुःखाने प्रिय अभिनेता, सामाजिक कार्यकर्ता आणि दिव्यांगांच्या हक्कांचा पुरस्कर्ता आरजे मिट्टे यांच्या निधनाची बातमी देत आहोत,” असे या निवेदनात म्हटले आहे.
मृत्यूचे नेमके कारण अधिकृत निवेदनात स्पष्ट करण्यात आलेले नाही. काही माध्यमांनी आत्महत्येचा उल्लेख केला असला, तरी या वृत्ताबाबत अधिकृत माहिती आणि तपासातील निष्कर्षांची प्रतीक्षा आहे
‘ब्रेकिंग बॅड’मधील भूमिकेमुळे मिळाली जगभरात ओळख
आरजे मिट्टेला ‘ब्रेकिंग बॅड’ या लोकप्रिय मालिकेमुळे जगभरात ओळख मिळाली. या मालिकेच्या पाचही सीझनमध्ये त्याने वॉल्टर व्हाईट ज्युनियरची भूमिका साकारली. त्याच्या अभिनयाचे प्रेक्षकांनी कौतुक केले होते. मालिकेतील त्याचे पात्र आणि त्याची वैयक्तिक परिस्थिती यांच्यातील साम्यामुळेही त्याच्या भूमिकेला विशेष महत्त्व प्राप्त झाले.
विशेष म्हणजे, मालिकेतील पात्राप्रमाणेच आरजे मिट्टे यालाही सेरेब्रल पाल्सी होता. वयाच्या तिसऱ्या वर्षी त्याला या स्थितीचे निदान झाले होते. मात्र, त्याने अभिनयासोबतच दिव्यांग व्यक्तींचे प्रतिनिधित्व आणि त्यांच्या हक्कांसाठीही सातत्याने काम केले. तो दिव्यांगांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या संस्थांशी जोडलेला होता.
आरजे मिट्टे आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत होता. २०२५ मध्ये त्याने आपली प्रेयसी केनेडी सुआरेझ हिच्याशी साखरपुडा केला होता. तिच्या ३०व्या वाढदिवशी, १० ऑक्टोबर २०२५ रोजी त्याने तिला लग्नाची मागणी घातली होती. या दोघांच्या नात्याबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता होती
आरजे मिट्टेच्या निधनाच्या बातमीने त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. अभिनयासोबतच दिव्यांगांच्या हक्कांसाठी केलेल्या कामामुळेही त्याची आठवण ठेवली जाईल.