
'कमळी' फेम इला भाटे यांच्याशी खास बातचीत
‘कमळी’ या मालिकेने फारच कमी कालावधीमध्ये प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे आणि त्यातही अन्नपूर्णा आजी तर प्रत्येकाला आपलीशी वाटतेय. आपली आजी असेल तर ती अन्नपूर्णा आजीसारखीच अशी भावना यावी इतकी सुंदर भूमिका अभिनेत्री इला भाटे करत आहेत. इला भाटे हे नाव इंडस्ट्रीत नक्कीच नवं नाही. गेले अनेक वर्ष मालिका, चित्रपट आणि नाटकांमधून आपल्या सहजसुंदर आणि नैसर्गिक अभिनयाने इला भाटे यांनी सर्वच प्रेक्षकांना आपलंसं करून घेतलं आहे.
‘कमळी’ आणि ‘लक्ष्मी निवास’ या मालिकांचा महासंगम ७ दिवस प्रेक्षकांसाठी सुरु झालाय आणि यावेळी कमळी आणि तिची आजी मकरसंक्रांतीला एकत्र येणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. कधी एकदा कमळी आणि अन्नपूर्णा आजी एकमेकांना भेटणार असा ध्यास प्रेक्षकांनाही लागला आहे. यासाठीच नवराष्ट्रने इला भाटे यांच्याशी मनसोक्त गप्पा मारल्या आणि त्यांनीही अगदी दिलखुलासपणे उत्तरं दिली आहेत.
अन्नपूर्णा ही व्यक्तिरेखा का निवडली?
इला भाटे यांनी अगदी उत्साहाने सांगितले की, ‘आजीच्या वयाला साजेशी आणि त्यातही अत्यंत आव्हानात्मक आणि हिरो वा हिरॉईनइतकंच योगदान असणारी ही भूमिका आहे आणि जेव्हा मला या भूमिकेबाबत सांगण्यात आले तेव्हा ती भूमिका नाकारण्याचा प्रश्नच नव्हता. देवावर प्रचंड विश्वास असणारी आणि शैक्षणिक समूहाची जबाबदारी सांभाळणारी, दोन्ही गोष्टी अत्यंत सहजतेने पेलणारी अशी ही भूमिका अत्यंत निर्भिड आणि तितकीच हळवी आहे आणि त्यामुळे ही भूमिका करावीशी वाटली. या भूमिकेला खूपच वेगवेगळे पैलू आहे, त्यामुळे काम करतानाही मजा येते’
zee Marathi Serial: ‘कमळी’मध्ये प्रेम, कट आणि ड्रामा, ऋषी कमळीसमोर आपलं प्रेम व्यक्त करेल?
प्रोमोमध्ये तुम्ही पहिल्यांदाच असे Action Sequence करताना दिसलात तर अनुभव कसा होता?
‘आतापर्यंत विविध भूमिका केल्या आहेत आणि ही भूमिका साकारताना ती केवळ घरगुती आजी नाही तर समाजासाठी काहीतरी देणं लागतो या मताची निर्भिड स्त्री देखील आहे आणि मराठी शाळा वाचविण्यासाठी लढा द्यायला ती स्वतः मैदानात उतरत आहे, हे किती छान आहे. याशिवाय लक्ष्मीसह तिचं काय नातं आहे आणि आपल्या नातीप्रमाणेच तिच्यासाठी इतर गोष्टीही किती महत्त्वाच्या आहेत हेदेखील पैलू यातून उलगडणार आहेत, असं काम करताना खूपच मज्जा आली आणि यावेळी महासंगम पाहून प्रेक्षकांनाही नक्कीच मजा वाटेल’ असं अगदी सहजपणाने इला भाटे यांनी सांगितले.
दोन मालिकांचे कलाकार एकत्र काम करताना गोंधळ होत नाही का?
यावर हसून इला भाटे म्हणाल्या, ‘आताचे सर्वच कलाकार व्यावसायिक आणि त्यासह खूपच मोकळ्या स्वभावाचे आहेत. अत्यंत खेळीमेळीत काम करतात. गेल्या काही वर्षात काम करण्याची पद्धत बदलली आहे. एकमेकांचा कम्फर्ट झोन काय आहे आणि सर्वांना सोयीस्कर होतंय ना हे सर्व पाहून एकत्र काम केलं जातं. इतकंच नाही तर बरीच वर्ष काम करत असल्यामुळे कधी ना कधी कुठेतरी या कलाकारांसह काम केलंय. त्यामुळे सहसा काही गोंधळ होत नाही आणि त्याशिवाय सीन करताना तरूण कलाकारही स्वतः येऊन गप्पा मारतात, समजून घेतात त्यामुळे काम करणं अधिक सोपं होतं’
विजया, निखिल, केतकी या Gen – Z कलाकारांसह काम करण्याचा अनुभव कसा आहे?
यावर इला भाटे सहज म्हणाल्या की, ‘Gen – Z कलाकारांची फारच वेगळी पद्धत आहे. सोशल मीडियामुळे आमच्या इंडस्ट्रीतही खूप बदल झाला आहे. सोशल मीडिया किती गरजेचं आहे हे मी यांच्याकडून शिकतेय. इतकंच नाही तर सेटवर टेक्निकल गोष्टी शिकणं, त्याचं ज्ञान घेणं आणि त्या गोष्टींचं भानही या नव्या मुलांना आहे. या सर्व मुलांकडून मला तर खूपच वेगवेगळं शिकायला मिळतंय आणि माहितीही मिळते आहे’, यावर त्यांनी अजून एक मजेशीर किस्सा सांगितला, ‘माचा जी, बोबा टी असं बरंच काही कळलंय मला यांच्याकडून आणि यांची भाषा इतकी मजेशीर आहे की मला मजा येते. याशिवाय या मुलांची एनर्जी कमाल आहे आणि ती मला त्यांच्याकडून मिळतेय. पण या सगळ्यानंतर मी सोशल मीडियावर येईन की नाही हे मात्र सांगता येत नाही’
कमळीच्या आयुष्यात येणार संघर्ष! सरोज आणि कमळीची होणार का भेट?
७ दिवसांचा महासंगम पहिल्यांदाच होतोय, तर तुमचा अनुभव?
यावेळी इला भाटे यांनी अगदी मनापासून सांगितलं की, ‘याआधी पण तारिणीसह महासंगम झालाय आणि आता लक्ष्मी निवाससह आहे. काम करताना कलाकारांना नक्कीच खूप वेगळा अनुभव मिळतो आणि सर्व कलाकार सुखात आणि मजेत असतात. पण मला वाटतं की, टेक्निकल टीम आणि प्रॉडक्शन यांचं काम मात्र वाढीला लागतं आणि त्यांच्यावर या सगळ्याचं अधिक प्रेशर येतं. पण अर्थात प्रेक्षकांना असे महासंगम बघायला आवडतात त्यामुळे सगळेच मनापासून मेहनत करतात’
मकरसंक्रांतीला मोठी नात कमळीची भेट होणार का? प्रेक्षकांना काही Hint?
या प्रश्नानंतर इला भाटे अगदी मनापासून हसल्या. म्हणाल्या, ‘७ दिवस हा प्रवास अगदी रहस्यमय, रोमांचक असणार आहे आणि प्रेक्षकांना माहीत आहे की, कमळी हीच अन्नपूर्णाची खरी नात आहे पण आता अन्नपूर्णाला याबाबत कळणार की नाही हे प्रेक्षकांना ७ दिवस पहावंच लागणार आहे त्यातच खरी मजा आहे आणि प्रेक्षकांची उत्सुकता यावेळी नक्कीच अडीअडचणीच्या आणि नाट्यमय प्रवासात ताणली जाणार आहे इतकी हिंट मी देते’
इला भाटे यांच्याशी गप्पा मारल्यानंतर आपलीच आजी आपल्याशी गप्पा मारत आहे इतकं नैसर्गिक नातं मात्र नक्की जाणवतं. दरम्यान कमळीला तिची खरी आजी आहे आणि आपण महाजन कुटुंबाचा भाग आहोत हे या आठवड्यात कळणार का पहाणे औत्सुक्याचे ठरेल.