अभिनेता विवेक सांगळेचा अभिनयाचा प्रवास
‘लग्नानंतर प्रेम होईलच’ या मालिकेतील ‘जीवा’ ही भूमिका अभिनेता विवेक सांगळेने साकारली आहे आणि अक्षरशः त्याने जीवा जगला आहे असं म्हटलं तर नक्कीच अतिशयोक्ती ठरणार नाही. कोणत्याही मालिकेत जीव ओतून काम करणारा आणि ती भूमिका आपल्यासाठीच योग्य होती हे सहजपणाने सिद्ध करणारा अष्टपैलू अभिनेता म्हणजे विवेक सांगळे. विवेकने नुकतेच लालबागमध्ये आपले हक्काचे नवे घर घेतले असल्यानेही तो चर्चेत आला आहे आणि याआधी ‘भाग्य दिले तू मला’ या मालिकेने तरूणींच्या मनातही घर केले आहे. नवराष्ट्रशी विवेकने वेळात वेळ काढून गप्पा मारल्या आहेत आणि त्याच्या संपूर्ण प्रवासाबाबत खुलासा केला आहे, जाणून घ्या विवेकचा हा मनोरंजन क्षेत्रातील तितकाच मनोरंजक प्रवास
कशी झाली Acting ची सुरूवात?
विवेकने सांगितले की, ‘Acting शी सुरूवातीला काहीच संबंध नव्हता. पण अनवधानाने तो एका व्यक्तीला भेटला आणि त्यानंतर त्याच्या डोक्यात अभिनयाबाबत विचार सुरू झाले. त्यानंतर त्याने वेगवेगळ्या ठिकाणी Audition द्यायला सुरूवात केली आणि नंतर ज्युनियर भूमिका साकारायला सुरूवात केली. पण हे सर्व करताना त्याला Diction किती महत्त्वाचे आहे हेदेखील कळले आणि त्यावर काम करून त्याला सर्वात पहिले नाटक मिळाले. त्यानंतर त्याचा प्रवास सुरू झाला आणि गेल्या १५ वर्षांपासून तो या प्रवासामध्ये माहीर झालाय.’
मधु इथे चंद्र तिथे, बंध रेशमाचे अशा मालिकांमधून विवेकने अगदी एक – एक वाक्याची भूमिकाही साकारली आहे. मात्र ‘कल्पतरू’ या सह्याद्री वाहिनीच्या मालिकेत त्याला मुख्य भूमिकेची संधी मिळाली आणि ‘देवयानी’ मालिकेने त्याला ओळख दिली. पण ‘भाग्य दिले तू मला’ या मालिकेने घराघरात पोहचवून त्याला फेम मिळवून दिले हे विवेकने आवर्जून सांगितले आहे.
भूमिका निवडताना विवेक नक्की काय विचार करतो?
विवेकने मनसोक्तपणे सांगितले जेव्हा सुरूवातीला त्याने भूमिका करायला सुरूवात केली तेव्हा काही पर्यायच नव्हता. पण नंतर जेव्हा या क्षेत्रात जम बसवायला सुरूवात झाली तेव्हा तो याबाबत विचार करू लागला. पण त्याआधी EMI आहेत किंवा आपल्याला या क्षेत्रात काम करायचे आहे त्यामुळे मिळेल ती भूमिका करत असल्याचे त्याने कबूल केले.
मात्र त्याचबरोबर भूमिकांच्या बाबतीत आपण अत्यंत नशिबवान आहोत हेदेखील त्याने म्हटले. कारण आतापर्यंत देवयानी, आम्ही दोघी, लव्ह लग्न लोचा, काळूबाई, भाग्य दिले तू मला आणि आता लग्नानंतर प्रेम होईलच या मालिकांमध्ये नेहमीच त्याच्या कामाची प्रशंसा झाली आहे आणि त्यामुळे त्याला कधी मागे वळून पाहावं लागलं नाही. मात्र त्यासाठी त्याने बरेच कष्ट घेतले आहेत हे मात्र नक्की.
‘लग्नानंतर होईलच प्रेम’ बाबत काय सांगशील?
विवेकची मालिका सध्या टॉपवर आहे. 1 नंबरवर ट्रेंड करणाऱ्या मालिकेचे श्रेय कोणाला? असा प्रश्न विचारल्यावर आम्ही ते चारही कलाकारांनी दिले पण तेव्हा विवेकने ठामपणे आणि नम्रपणे त्याचे मत मांडले. विवेक म्हणाला की, ‘खरं तर कलाकार काम करतात अगदी जीव ओतून काम करतात, पण मालिकेचे खरे श्रेय हे लेखकांनाच जाते. कारण मालिका खिळवून ठेवण्यासाठी लेखक आणि स्क्रिनप्ले खूपच महत्त्वाचा असतो. त्यानंतर दुसरे श्रेय जाते ते दिग्दर्शकांना आणि त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर कलाकारांचा अभिनय येतो.’
तू असं इतक्या ठामपणाने कसं सांगू शकतोस असं विचारल्यावर विवेक म्हणाला की, ‘आतापर्यंत अनेक मालिकांमध्ये प्रचंड यशस्वी कलाकार काम करत असतात. पण त्यांची प्रत्येक मालिका यशस्वी होतेच असं नाही’, इतकंच नाही तर त्याने अभिमानाने सांगितले की, मराठी प्रेक्षकांनी या मालिकेतील क्रॉस लग्न इतकं मनावर घेतलं की, आता ही मालिका गेल्या कित्येक महिन्यांपासून YouTube वर देखील १ नंबरवर आहे.
सेलिब्रिटी ‘गुढीपाडवा’…, मराठमोळे कलाकार कसे सेलिब्रेट करतात मराठी नववर्ष ?
कामाचे तास जास्त वाटतात का?
विवेकने आपले मत यावर स्पष्टपणे मांडले. विवेकच्या मते त्याला १२ तास काम करणे अजिबात चुकीचे वाटत नाही. पण एखाद्या अभिनेता वा अभिनेत्रीला तसे वाटत असेल तर कामाला सुरुवात करण्यापूर्वीच या गोष्टी सोडवून घ्याव्या. ‘आठवड्यातून ५ दिवस काम अथवा महिन्यातून २३-२४ दिवस काम करणं मला कठीण वाटत नाही. यामध्ये तक्रार करण्यासारखं काहीही नाही’ असं विवेक म्हणाला.
लालबागमध्ये घर का घेतले? विवेकचं भावूक उत्तर
विवेक सांगळे लालबागमध्ये लहानाचा मोठा झालाय आणि गेल्या काही दिवसांपासून त्याच्या नव्या घराविषयीदेखील चर्चा आहे. विवेकला प्रश्न करण्यात आला होता की, ‘तू ठाणे अथवा गोरेगाव बाजूला इतर कलाकारांप्रमाणे घर का नाही घेतलेस?’ यावर त्याचे उत्तर नक्कीच आजच्या प्रत्येक मुलामुलींना विचार करायला लावणारे आणि भावूक आहे.
विवेक म्हणाला की, ‘माझ्या वडिलांनी गेली ७० वर्ष इथे लालबागमध्ये काढली आहेत आणि घरात आई-वडिलांना कोंडून का बरं ठेवावं. इतर ठिकाणी गेले तर त्यांनी Adjust करणं मला पटत नाही. मी घराबाहेर 12-14 तास असतो. त्यामुळे आताच्या घरातही काही वेगळं नाही, पण किमान ते सोसायटीतून खाली गेल्यानंतर त्यांच्या ओळखीची माणसं आहेत आणि त्यांच्यासह आई-वडील रमू शकतात.’
तसंच विवेक पुढे म्हणाला की, ‘माणसाने आयुष्यात पुढे जायला हवं आणि माझ्या मते मला जर पुढे जायचं असेल तर मी गोरेगाव वा ठाण्याला न जाता वाळकेश्वरला जाईन ना?’ शिवाय दक्षिण मुंबई सोडून जाणं मनाला पटत नाही यावरही विवेक ठाम आहे. तसंच त्याने एक मांडलेला मुद्दा म्हणजे, ‘आपण मराठी माणूस लालबाग सोडतोय’ असं म्हणतो मग तसं करण्यात मला काहीच लॉजिक वाटलं नाही असं त्याने आवर्जून आणि अभिमानाने सांगितले.
विवेकने यावेळी आमच्याशी अगदी कोणताही आडपडदा न ठेवता आवर्जून गप्पा मारल्या आणि त्याचा मनमोकळेपणा आणि स्पष्ट मुद्दे मांडण्याची सवय पाहून नक्कीच सांगावे लागते की, ‘लालबागचा पोरगा’ आपल्या कष्टाने इथपर्यंत आलाय आणि मराठी प्रेक्षकांच्या मनावर हक्काने राज्य करतोय.