
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
नवीन वर्षाच्या सुरुवातीसच निर्माता आणि अभिनेता आदिनाथ कोठारे चर्चेत आला आहे. सध्या सुरू असलेली त्याची मालिका ‘नशीबवान’ प्रेक्षकांच्या भरभराटीच्या प्रेमामुळे अव्वल ठरली आहे. टीआरपीच्या यादीत ही मालिका नंबर 2 वर असून, छोट्या पडद्यावर आदिनाथची कामगिरी प्रेक्षकांच्या मनावर घर करून गेली आहे. पण इथेच थांबण्याची गोष्ट नाही. 2026 हे वर्ष आदिनाथसाठी नाविन्यपूर्ण प्रोजेक्ट्सने भरलेले असणार आहे. अनेक दिवसांपासून छोट्या पडद्यावर झळकणारा आदिनाथ या वर्षात अनेक बिग बजेट प्रोजेक्ट्सचा भाग होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.चित्रपट, ओटीटी आणि मालिका या तिन्ही क्षेत्रात वैविध्यपूर्ण भूमिका साकारून प्रेक्षकांचा मनोरंजन करण्यासाठी आदिनाथ सज्ज होत आहे. या वर्षी त्याचा लूक आणि भूमिका यांचा अनुभव प्रेक्षकांना नक्कीच थरारक ठरणार आहे.आदिनाथच्या फॅन्ससाठी 2026 हे वर्ष रोमांचक आणि मनोरंजक ठरणार आहे, कारण तो आपल्या प्रेक्षकांसमोर नवीन स्वरूपात आणि आव्हानात्मक भूमिकांमध्ये दिसणार आहे.
ज्या प्रोजेक्टने संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतलं आहे असं बहुचर्चित “रामायण” हा चित्रपट वर्षात प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून आदिनाथ यात “भरत” ही भूमिका साकारताना दिसणार आहे. रामायणातील भरत ही व्यक्तिरेखा आदिनाथ कशी साकारणार? त्याचा लूक काय असणार? हे बघण उत्कंठावर्धक ठरणार आहे.
“बेनं” हा आगळा वेगळा विषयावर आधारित असलेला मराठी चित्रपट आदिनाथ करणार असून आजवरच्या त्याचा भूमिका पेक्षा यात तो वेगळ्या अंदाजात नवी गोष्ट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. “बेनं” चित्रपटात तो दुहेरी भूमिका साकारताना दिसणार असून अभिनेता आणि निर्मिती या दोन्ही भूमिका तो पार पाडणार आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट अनेक फिल्म फेस्टीवल मध्ये देखील दाखवण्यात येणार असल्याचं कळतंय. “बेनं” हा चित्रपट फिल्म फेस्टिवल फिरून आल्या नंतर चित्रपटगृहात रिलीज होणार आहे.या सगळ्या बद्दल बोलताना आदिनाथ सांगतो “प्रेक्षकांचं प्रेमच माझी खरी ताकद आहे. 2026 मध्ये वेगवेगळ्या कथा, वेगवेगळ्या भूमिका आणि मनापासून केलेलं काम तुम्हाला दिसेल”
एकंदरीत या वर्षात आदिनाथ हा बड्या स्टार्सच्या सोबतीने बिग बजेट प्रोजेक्ट्सचा महत्त्वपूर्ण भाग होणार असून हंसल मेहता यांच्या “गांधी” या वेब सीरिज मध्ये महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार असल्याचं कळतंय. गांधी बद्दल ची उत्सुकता प्रेक्षकांना असताना ” झपाटलेला 3 ” या चित्रपटाचं शूटिंग सुद्धा या वर्षात तो कळणार असल्याचं कळतंय.ओटीटी, चित्रपट, मालिका या तिन्ही विश्वात वैविध्यपूर्ण भूमिका साकारून प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आदिनाथ अनेक नवनवीन प्रोजेक्ट्स या वर्षात करणार असून अजून तो कुठल्या भूमिकांमध्ये झळकणार हे बघण उत्सुकतेच ठरणार आहे.