
(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)
झी मराठी वाहिनीवर लवकरच शुभ श्रावणी ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दोन दिवसांपूर्वी झी मराठीने त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर या नव्या मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे. या मालिकेत‘शुभ श्रावणी कुटुंबातील नात्यांची उब, मनातील न सांगितलेलं दुख: आणि हळुवार फुलत जाणारी प्रेमकथा यांचा मोहक संगम “शुभ श्रावणी” मालिकेच्या निमित्ताने प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे.
या कथेत केंद्रस्थानी आहे श्रावणी राजेशिर्के, शिक्षणमंत्री विश्वंभर राजेशिर्के यांची मुलगी. चैतन्यमय, आनंदी आणि सगळ्यांना हसवत ठेवणारी श्रावणी आपल्या मनातील दुःख मात्र कुणासमोर व्यक्त करत नाही. भूतकाळातील काही कटू घटनांमुळे वडील विश्वंभर तिच्यापासून दुरावले आहेत, इतके की तिच्या सावलीलाही ते जवळ येऊ देत नाहीत. वडिलांनी एकदाच का होईना, प्रेमाने जवळ घ्यावं—ही श्रावणीची आयुष्यभराची अपूर्ण इच्छा आहे.
याच भावनिक संघर्षाचा साक्षीदार आहे शुभंकर शेलार, विश्वंभर यांचा अत्यंत जवळचा आणि विश्वासू सहकारी. सावलीसारखा श्रावणीच्या सोबत राहणारा शुभंकर तिच्या वेदना, तिचं एकटेपण, तिचं न सांगितलेलं दुःख जवळून पाहतो. सगळं समजून घेणारा, शांत, समंजस आणि प्रगल्भ शुभंकर तिच्या आयुष्यात अनाहूतपणे एक आधार बनत जातो. या मालिकेत प्रमुख भूमिकेत असणार आहेत वल्लरी विराज, सुमित पाटील आणि मराठी मनोरंजनविश्वातील ज्येष्ठ आणि प्रेक्षकांचे लाडके अभिनेते लोकेश गुप्ते तब्बल ९ वर्षांनंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन करण्यास सज्ज झाले आहेत.
या पुनरागमनाबद्दल बोलताना लोकेश गुप्ते म्हणाले, “मी ९ वर्षांनंतर अभिनय करणार आहे. या ९ वर्षांत मी प्रामुख्याने दिग्दर्शन आणि लेखनावर लक्ष केंद्रित केल होत. त्यामुळे तब्बल ९ वर्षांनी पुन्हा अभिनयाच्या कॅनव्हासला स्पर्श करताना वेगळीच ऊर्जा जाणवतय. अभिनयातून ब्रेक घेण्यापूर्वी मी झी मराठीवरील ‘खुलता कळी खुलेना’ ही मालिका केली होती. आणि खरं सांगायचं तर, माझ्या बहुतेक मालिका मी झी मराठी सोबतच केल्या आहेत. आता या ब्रेकनंतर पुन्हा एका झी मराठीच्या एका नवीन शोमधून कमबॅक करत आहे, आणि यासाठी मी खूप उत्सुक आहे.”
शुभ श्रावणी’ मालिका सुरु झाल्यावर ही मालिका प्रेक्षकांचं प्रेम कसं जिंकणार याची सर्वांना उत्सुकता आहे. प्रेक्षकांना मालिकेचा प्रोमो आवडला असून वल्लरीला पुन्हा वेगळ्या भूमिकेत बघण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.