
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
अभिनयाच्या पलिकडे जाऊन स्वतःच्या आवडी आणि कलागुण जोपासत आज अनेक कलाकार विविध उपक्रम करताना दिसत आहेत. त्यातच काही कलाकार समाजासाठी वेगळं काहीतरी करून त्याचा फायदा गरजू लोकांना पोहोचवण्याचा प्रयत्न करतात, आणि त्याच्यातील एक महत्त्वाचा उपक्रम म्हणजे ‘क्लाऊलिंग’.
‘क्लाऊलिंग’ हा फक्त कलेचा एक प्रकार नसून, कलेच्या माध्यमातून समाजाला संदेश देण्याची अनोखी परिभाषा मानली जाते. कलाकार आपल्या कला कौशल्याचा वापर करून हसण्याच्या माध्यमातून लोकांना मानसिक आधार, आनंद आणि प्रेरणा देत आहेत. या प्रकारात मनोरंजन, सामाजिक बदल आणि शिक्षण यांचा अद्वितीय संगम पाहायला मिळतो.
क्लाऊन्स विदाऊट बॉर्डर्स इंडिया ही रुपेश टिल्लू यांनी स्थापन केलेली नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था असून आज अनेक कलाकार मंडळी यात जोडली गेली आहे. अभिनेत्री अक्षया नाईक, अंकिता निकरड, गायत्री बनसोडे आणि अभिनेता आशय कुलकर्णी देखील या प्रोजेक्ट चा महत्त्वपूर्ण भाग आहे.
या बद्दल बोलताना रुपेश टिल्लू सांगतात “जीवनातील विविध आव्हानांना सामोरे जाणाऱ्या मुलांना आणि प्रौढांना आनंद देणे हे क्लाऊलिंग च महत्त्व आहे. हसण्याच्या सार्वत्रिक भाषेद्वारे आम्ही मानसिक-समाजिक आधार देण्याचा प्रयत्न करतो, तणाव कमी करतो, जिद्द वाढवतो आणि चांगल्या भविष्याची आशा निर्माण करतो. आमची कुशल क्लाऊन्सची टीम थेट सादरीकरणांद्वारे भावनिक शुद्धीकरण, उपचार आणि मनमोकळेपणा निर्माण करते ज्यामुळे व्यक्तींना उज्ज्वल भविष्याची कल्पना करता येते. आमचा विश्वास आहे की हसण्यात समाजाला एकत्र आणण्याची आणि उन्नत करण्याची ताकद आहे.आशा, स्वप्नं आणि लोकशाही मूल्ये फुलणारा सुसंवादी समाज घडवणे हे आमचे उद्दिष्ट आहे, जे सामूहिक विकास आणि सामायिक शक्यतांना प्रेरणा देईल”
आजवर वाडा, पालघर येथे झालेल्या आर्ट रेसिडेन्सीमध्ये भारतभरातील प्रतिभावान कलाकार एकत्र येऊन नाविन्यपूर्ण क्लाऊन सादरीकरणांची निर्मिती केली आहे. ही सादरीकरणे पालघर जिल्ह्यातील १० पेक्षा अधिक शाळांमध्ये सादर करण्यात आली, ज्यामध्ये जिल्हा परिषद शाळा आणि आश्रमशाळांतील ५,००० हून अधिक मुलांनी सहभाग घेतला. हा उपक्रम सामाजिक परिवर्तनासाठी क्लाऊनिंगला प्रभावी साधन म्हणून पुढे नेणारी राष्ट्रीय चळवळ बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे हे नक्कीच !