
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
फॅशन, चित्रपट, ओटीटी तिन्ही विश्वात आपले नाव गाजवणारी प्राजक्ता माळी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. आजवर प्राजक्ताने अनेक भूमिका साकारल्या आहेत, परंतु अभिनेत्री तिच्या आगामी “देवखेळ” वेब सीरिजमध्ये एका अनोख्या भूमिकेत प्रेक्षकांना दिसणार आहे. तसेच, नुकताच “देवखेळ” चा ट्रेलर प्रदर्शित झाला असून कोकणातील ही गोष्ट आणि त्यातून उलगडणारी अनोखी कहाणी या नव्या कोऱ्या वेब सीरिज मध्ये अनुभवयाला मिळणार असल्याचे समोर आले आहे.
Matrubhumi : मनाला भिडेल असे आहे Battle Of Galwan चे नवीन गाणे, सलमान खानने जाहीर केली रिलीज डेट
प्राजक्ताला या मालिकेची पटकथा वाचण्यापूर्वी तुम्हाला शंकासुराविषयीची दंतकथा माहीत होती का? असं विचारलं असताना ती म्हणाली, “शंकासुराबद्दल मी याआधी कधीही ऐकले नव्हते आणि या विधीविषयीही मला माहिती नव्हती. मी कोकण भागातील नाही आणि माझे तिकडे नातेवाईकही नाहीत, त्यामुळे ही संकल्पना माझ्यासाठी पूर्णपणे नवीन होती. मात्र, शंकासुराविषयी पहिल्यांदा ऐकताना मला माझ्या आईच्या गावातील – भाळवणी (पंढरपूरजवळ) – एका खूपच मिळतीजुळती परंपरेची आठवण झाली.”
अभिनेत्री पुढे म्हणाली, “आमच्या गावात पालखीऐवजी ‘कावड’ ही प्रथा आहे. दोन वेगवेगळ्या जातीतले लोक दोन कावडी खांद्यावर घेऊन नाचत, भक्तीभावाने गावातून फिरतात आणि नंतर त्या शनी शिंगणापूरला नेल्या जातात, जिथे मोठा उत्सव होतो. अतिशय जवळच्या दोन मित्रांना समर्पित ही परंपरा आहे, ज्यांनी आयुष्यभर एकत्र राहण्याची शपथ घेतली होती. ही परंपरा पिढ्यान् पिढ्या चालत आली आहे, आणि त्यामुळे शंकासुराची कथा ऐकताच ती मला लगेचच आपलीशी वाटली”.
PIFF 2026 मध्ये मराठी चित्रपट ‘बाप्या’चा डंका ! सर्वोत्कृष्ट चित्रपटासह पटकावले तीन मानाचे पुरस्कार
पटकथा वाचताना तिला अनेक गोष्टी शिकवून गेल्या या बद्दल सांगताना ती म्हणाली, “शंकासुरामध्ये महाराष्ट्राचं सार फार सुंदर रीतीने गुंफलेलं आहे, हे मला खूप आवडलं. एकीकडे महाराष्ट्र अतिशय धार्मिक आहे – श्रद्धा, भक्ती, विधी आणि परंपरांवर विश्वास ठेवणारा. पण त्याच वेळी तो तितकाच व्यावहारिक, तर्कशुद्ध आहे आणि आंधळ्या श्रद्धेला सहज स्वीकारत नाही. या दोन विरुद्ध विचारधारा आपल्या संस्कृतीत खूप ठामपणे एकत्र नांदतात आणि शंकासुर ही द्वंद्वस्थिती अत्यंत प्रभावीपणे दाखवतो. प्रेक्षक म्हणून मी स्वतःही सतत ‘बरोबर काय, चूक काय’ याचा विचार करत राहिले, आणि त्यामुळे अनुभव खूपच गुंतवून ठेवणारा झाला. मात्र, सर्वात जास्त लक्षात राहिलं ते शेवट. तो अतिशय तर्कसंगत, वास्तववादी आणि मनाला भिडणारा होता. तो शेवट मला खूपच आवडला”.
कोकणातील फारशा ऐकिवात नसलेल्या लोककथांपासून प्रेरित, देवखेळ हा एक गहन मानसशास्त्रीय थरारपट आहे. जो शिमगा (होळी) सणाच्या भीतीदायक पार्श्वभूमीवर परंपरा, अंधश्रद्धा आणि गुन्हेगारी यांची सरमिसळ करतो. ही सिरीज येत्या 30 जानेवारीपासून ZEE5 वर स्ट्रीम होणार आहे. तसेच ही वेब सीरिज प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करणार आहे.