
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
कलर्स मराठीवरील ‘जय जय स्वामी समर्थ’ या मालिकेत कथा आता अशा वळणावर येऊन ठेपली आहे, जिथे श्रद्धा, लोभ आणि कर्म यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होत चालला आहे. काही लोकांसाठी भक्ती हा साधनेचा मार्ग आहे, तर काहींसाठी ती केवळ स्वार्थ साध्य करण्याचं साधन बनताना दिसते आहे. चुकीचे निर्णय, अति महत्त्वाकांक्षा आणि अंधश्रद्धेची सरमिसळ यामुळे घडणाऱ्या घटनांनी गावात अस्वस्थता पसरली आहे. या पार्श्वभूमीवर, मालिकेचा सध्याचा प्रवास प्रेक्षकांना सतत अंतर्मुख करत आहे खरी श्रद्धा नेमकी कोणती?
या सगळ्या घडामोडींमध्ये स्वामी समर्थ केवळ साक्षीदार नाहीत, तर प्रत्येक घटनेमागील दैवी सूत्रधार आहेत. त्यांच्या शांत उपस्थितीतून, गूढ वाक्यांतून आणि सूचक लीलांमधून ते एक महत्त्वाचा संदेश देताना दिसतात. कर्मापासून कोणीच सुटत नाही, मात्र भक्ती कर्माची तीव्रता कमी करू शकते. स्वामींच्या प्रत्येक शब्दामागे आणि कृतीमागे खोल अर्थ दडलेला आहे. त्यांच्या हालचाली, त्यांची वाटचाल आणि दिलेले संकेत, येणाऱ्या काळात एक अत्यंत निर्णायक अध्याय उलगडणार असल्याची जाणीव करून देतात.
महानिर्वाणाचा हा अध्याय प्रेक्षकांसाठी केवळ कथानकाचा भाग नाही, तर श्रद्धेची कसोटी आहे. हा टप्पा शिकवतो की स्वार्थातून केलेली भक्ती अखेरीस रिकामी ठरते, तर निःस्वार्थ परमार्थ जीवनाला योग्य दिशा देतो. पुढील भागांमध्ये कथा अधिक गंभीर आणि अर्थपूर्ण होत जाणार असून, अनेक पात्रांसाठी हा आत्मबोधाचा क्षण ठरणार आहे. स्वामी भक्तांसाठी हा प्रवास भावनिकही असेल आणि विचार करायला लावणारा देखील.
“जय जय स्वामी समर्थ” ही मालिका श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज यांच्या जीवनावर आधारित आहे. महाराजांच्या चमत्कारी आणि आध्यात्मिक कार्य या मालिकेतून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवले जाते. भक्तांच्या अडचणी सोडवणे, समाजातील अज्ञान दूर करणे आणि सर्वांना अध्यात्मिक मार्ग दाखवणे, हेच या मालिकेचं मुख्य सूत्र आहे.