
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
मराठी प्रेक्षकांना खळखळून हसवणारा आणि प्रचंड लोकप्रिय ठरलेला ‘साडे माडे तीन’ हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या मनात ताजा आहे. त्या ब्लॉकबस्टर कॉमेडीची आठवण पुन्हा एकदा जिवंत करत आता त्याचा सिक्वेल ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ वर्ल्ड डिजिटल प्रीमियरसह प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. येत्या १९ मार्च २०२६ पासून हा धमाल कॉमेडीपट ‘अल्ट्रा झकास’ या मराठी ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीमिंगसाठी उपलब्ध होणार आहे. हलक्याफुलक्या विनोदाने, कुरळे बंधूंच्या भन्नाट गोंधळाने आणि मजेदार प्रसंगांनी भरलेला हा सिक्वेल प्रेक्षकांना पुन्हा एकदा नॉस्टॅल्जियाचा खास अनुभव देणार आहे.
‘पुन्ह एकदा साडे माडे तीन’ या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन अंकुश चौधरीने केले असून, अल्ट्रा मीडिया आणि मनोरंजन प्रस्तुत हा चित्रपट दमदार कलाकारांच्या उपस्थितीमुळे विशेष ठरणार आहे. चित्रपटात अशोक सराफ, मकरंद अनासपुरे, भरत जाधव, सिद्धार्थ जाधव आणि संजय नार्वेकर यांच्यातील रिंकू राजगुरू, समृद्धी केळकर आणि संकेत पाठक यांचीही महत्त्वाची भूमिका पाहायला मिळणार आहे.
‘बनावट चित्रपट बनत आहेत’, नवाजुद्दीन सिद्दीकी संतापले; मोठ्या बॉलिवूड चित्रपटांवर साधला निशाणा
चित्रपटाची कथा रतन, चंदन आणि मदन या तीन विचित्र स्वभावाच्या भावांभोवती फिरते. या तिघांचं एक गॅरेज असतं आणि त्यांनी आपल्या आयुष्यासाठी एक कडक नियम बनवलेला असतो. “नो लेडीज, नो मॅरेज” मात्र अचानक घडलेल्या काही घटनांमुळे त्यांच्या आयुष्यात एका महिलेची एन्ट्री होते आणि त्यानंतर सुरू होतो गोंधळ, गैरसमज आणि भन्नाट प्रसंगांची कथा, जुन्या सवयी आणि नव्या अडचणींच्या या मजेशीर टक्करमध्ये या तिन्ही भावांचं आयुष्य अक्षरशः उलथापालथ होतं आणि प्रेक्षकांना मिळतो खळखळून हसवणारा कॉमेडीचा फुल डोस.
सुशीलकुमार अग्रवाल यांनी या चित्रपटाबद्दल बोलताना सांगितले की, “‘साडे माडे तीन’ या गाजलेल्या कॉमेडीची आठवण पुन्हा ताजी करणारा ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ हा चित्रपट प्रेक्षकांसाठी नक्कीच खास ठरेल. कुरळे बंधूंचा गोंधळ आणि खळखळून हसवणारे प्रसंग यामुळे हा चित्रपट संपूर्ण कुटुंबासोबत पाहण्यासारखा मनोरंजक अनुभव देईल. अल्ट्रा झकास वर या चित्रपटाचा वर्ल्ड डिजिटल प्रीमियर सादर करताना आम्हाला आनंद होत आहे आणि प्रेक्षक याचा मनसोक्त आनंद घेतील, याची आम्हाला खात्री आहे.”
भरपूर धमाल, मजेदार प्रसंग आणि दमदार कलाकारांची जुगलबंदी अनुभवण्यासाठी ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ हा चित्रपट १९ मार्च २०२६ पासून फक्त अल्ट्रा झकास या मराठी ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे प्रेक्षकांसाठी या प्लॅटफॉर्मवर ₹१९ पासून सुरू होणारी साप्ताहिक सबस्क्रिप्शन योजनाही उपलब्ध करण्यात आली आहे. तसेच अल्ट्रा झकास हा प्लॅटफॉर्म Android, iOS, टॅब, वेब, Android TV, Fire TV, Jio Store आणि Cloud TV वर सहज उपलब्ध असल्यामुळे प्रेक्षकांना हा चित्रपट कधीही आणि कुठेही पाहण्याचा आनंद घेता येणार आहे.