
फोटो सौजन्य AI
इस्रायलचे संरक्षणमंत्री इस्रायल काट्झ यांनी ८ नोव्हेंबर रोजी जेरुसलेम येथे आयोजित अधिकृत कार्यक्रमात इराणबाबत भूमिका स्पष्ट केली. इराणविरोधातील मोहीम अजून पूर्ण झालेली नाही, असे ते म्हणाले. इराण अण्वस्त्रे मिळवण्याचे प्रयत्न पुन्हा सुरू करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. इराणकडून निर्माण होणारा धोका इस्रायल स्वीकारू शकत नाही, असे सांगत काट्झ यांनी देशाच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य असल्याचे स्पष्ट केले.
इराणकडून संभाव्य धोका लक्षात घेता इस्रायल आपली सुरक्षा भूमिका अधिक आक्रमक करत असल्याचे काट्झ यांच्या वक्तव्यांतून दिसून आले. इस्रायल कोणत्याही परिस्थितीसाठी सज्ज असून, आवश्यकतेनुसार कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले. प्रतिबंधात्मक कारवाईचा पर्यायही इस्रायलच्या विचाराधीन असल्याचे त्यांच्या भूमिकेतून स्पष्ट होते. त्यामुळे इराण आणि इस्रायल यांच्यातील तणाव पुन्हा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Sweden News : होलोकॉस्ट नाकारणे आता ठरणार गुन्हा; स्वीडनच्या संसदेत घटनादुरुस्ती मंजूर
काट्झ यांनी इराणसोबत हिजबुल्लालाही स्पष्ट इशारा दिला आहे. इराणने इस्रायलवर हल्ला केल्यास हिजबुल्लाने त्यात सहभागी होऊ नये, असे त्यांनी बजावले. हिजबुल्लाने इराणच्या बाजूने इस्रायलविरोधात कारवाई केल्यास त्याला अत्यंत कठोर प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. गाझा, लेबनॉन आणि सीरियातील सुरक्षा क्षेत्रातून इस्रायली सैन्य माघार घेणार नसल्याचेही काट्झ यांनी स्पष्ट केले.
इस्रायलमधील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काट्झ यांचे हे विधान महत्त्वाचे मानले जात आहे. इराणविरोधातील संघर्ष पुन्हा तीव्र होण्याची शक्यता असताना इस्रायलने आपली सुरक्षा भूमिका कठोर ठेवली आहे. दुसरीकडे, इराणने अण्वस्त्रे मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप फेटाळला असून, शांततापूर्ण अणुऊर्जा कार्यक्रमाचा आपला अधिकार असल्याचे म्हटले आहे.