
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी 6 च्या घरात खेळ आता रंजक होत चाले आहेत. सीझन सुरू झाल्यापासून घरात रोज नवनवीन राडे पाहायला मिळत आहे. नुकताच या सीझनचा पहिला भाऊचा धक्का पार पडला. ज्यामध्ये रितेश देशमुखने पहिल्या आठवड्यात धिंगाणा घालणाऱ्या कलाकारांची चांगलीच शाळा घेतल्याचे आपण पाहिले. त्यानंतर सुरू झालेल्या दुसऱ्या आठवड्यात पुन्हा एक मोठा वाद झाला आहे. बिग बॉस मराठीच्या घरात नुकताच राकेश बापट आणि अनुश्री माने यांच्यात टोकाच भांडण झाल्याचं प्रेक्षकांना पाहायला मिळालं. राकेशने माझा हात खेचला, मला परवानगीशिवाय कोणीही हात लावू शकत नाही असं वक्तव्य अनुक्षीने केलं. यानंतर बिग बॉसच्या घरात एकच गोंधळ उडाला. अनुश्री आणि रूचिता यांचे विचित्र आरोप ऐकून राकेश चांगलाच संतापला. यावेळी तन्वी कोलतेने सुद्धा राकेशला पाठिंबा दिला.
शेवटी राकेश चिडून गार्डन एरियामध्ये निघून गेला. तिथे त्याने काहीशी आदळआपट केली. मात्र, आता या प्रकरणावर मराठी कलाकारांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. सोशल मीडियावर कलाकारांनी त्याला पाठिंबा दर्शवला आहे. अभिनेत्री आणि बिग बॉस मराठी च्या तिसऱ्या सीझनची सदस्य सोनाली पाटीलने यासंदर्भात व्हिडिओ शेअर करत आपलं मत स्पष्ट मांडत खंत व्यक्त केली आहे. सोनाली व्हिडिओमध्ये म्हणते, “आजचा विषय फार संवेदनशील आहे म्हणून बोलावंसं वाटलं आणि या विषयावर बोलायला पाहिजेच. ‘बिग बॉस मराठी’च्या सहाव्या सीझनला नुकतीच सुरुवात झालेली आहे. पण, आजचा एपिसोड पाहून थोडं वाईट वाटलं…थोडं म्हणण्यापेक्षा खूप जास्त वाईट वाटलं. मुद्दा असा होता की, अनुश्रीला राकेशने झोपेतून उठवलं आणि नंतर तिला ते काहीतरी विचित्र वाटलं. हा मला हात कसा लावू शकतो वगैरे ती बोलत होती. या मुद्द्यावर अनुश्री त्यावेळेला काहीच बोलली नाही. तिने या सगळ्याचा उलट पद्धतीने वापर केला.”
सोनाली पुढे म्हणाली, “दुसऱ्या दिवशी सकाळी चौकात बसणाऱ्या ज्या दीडशहाण्या पोरी आहेत, त्यांच्यामध्ये हा विषय निघतो…. मग वादाला सुरुवात होते. याठिकाणी मला तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट आठवण करून द्यायचीये. ती म्हणजे, आमच्या सीझनवर म्हणजे ‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या सीझनवर तुम्ही खूप प्रेम केलं…आजही मला सगळे पोस्ट, व्हिडीओ तुम्ही आवर्जून पाठवत असता. तेव्हा सुद्धा अशीच एक सेम घटना घडली होती. खरंतर आपल्याला माहितीही नसतं आपण काय करतोय कारण, आपला हेतू वाईट नसतो. आमच्या सीझनला त्यावेळी घरात विकास पाटील, मीनल होती आजही हे दोघं माझे खूप चांगले मित्र आहेत.”
”आज पुन्हा मला तसंच काहीसं पाहायला मिळालं. अनुश्री आणि रुचिताने काहीही आरोप केले. जर तुम्ही एवढ्या ‘काच की गुडीया’ आहात ना तर तुम्ही घरात बसा.” “आज घरात ज्यावेळी हा मुद्दा झाला…जेव्हा तुम्ही एखाद्याच्या चारित्र्यावर सोयीने बोट ठेवता. मग, समोरच्याला सांगता की आम्हाला गरज नसताना हात लावला. हे खरंच योग्य आहे का? तुमच्या चेहऱ्यावर घरात हजारो कॅमेरे आहेत…राकेशला आज काय वाटलं असेल? त्याचा हेतूच तसा नव्हता. एका क्षणाला आपल्याला कळतच नाही की, हे काय होतंय? कारण आपण तसं वागलेलो नसतो.”
“रितेश दादांना मी खरंच विनंती करते, दादा जे माझ्या बाबतीत झालं, ते कृपया राकेशच्या बाबतीत होऊ नये. कारण ‘बिग बॉस मराठी’चा प्लॅटफॉर्म खूप मोठा आहे आणि इथे सगळे नाव कमवायला येतात, घालवायला नाही. मुलगा असो किंवा मुलगी, प्रत्येकजण आपलं चारित्र्य जपून असतो. पण काही लोक त्याचं भांडवल करतात. आज राकेशला काय वाटत असेल, हे मी चांगल्या प्रकारे समजू शकते. अजून दुसरा-तिसरा आठवडा सुरूच आहे. त्यामुळे, रितेश दादा, भाऊला अशा धक्क्यावर येऊन तिथल्या ‘दीडशहाण्या’ लोकांना शहाणं करावं, तर फार बरं होईल. रितेश दादा, तुमी माझ्या सीझनला नव्हते, पण आता असं होऊ नये. इतक्या सगळ्या गोष्टी घडल्यानंतरही, माझ्या प्रेक्षकांनी मला कायम पाठिंबा दिला. त्याबद्दल मी त्यांची आणि ‘बिग बॉस मराठी’ची कायम ऋणी राहीन.”
Border 2 Advance Booking: अवघ्या २४ तासांत ५३,००० तिकिटांची विक्री, चित्रपटाची धमाकेदार सुरुवात