(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
मराठी चित्रपटसृष्टीत एक आगळावेगळा आणि ऐतिहासिक टप्पा गाठला जाणार आहे. “लग्न आणि बरंच काही” हा नवा मराठी चित्रपट पूर्णपणे महिला शक्तीच्या बळावर साकार होणार आहे. या चित्रपटाचे सर्व टप्पे स्त्रियांच्या कुशल हातांनी पार पाडले जाणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन वेदांती दाणी करणार असून, निर्मितीचा मान डॉ संजना सुरेश पै आणि अंजली नान्नजकर यांच्याकडे आहे. कथा लेखिका यशश्री मसुरकर यांनी केले आहे. तसेच या चित्रपटाचे छायाचित्रण स्मिता निर्मल करणार आहेत, तर संगीत दिग्दर्शन वैशाली सामंत करणार आहेत.
“तुला जपणार आहे” मालिकेत अशी झाली लुक टेस्ट; मनोज कोल्हटकरांनी सांगितलं शिवनाथची भूमिका कशी मिळाली?
पुढे चित्रपटाची संपूर्ण एडिटिंग भक्ती मायाळू, प्रोडक्शन डिजाइन मुग्धा कुलकर्णी, ब्युटी स्टायलिंग सुप्रिया शिंदे, पी आर प्रज्ञा सुमती शेट्टी, डिजिटल मार्केटिंग अश्मीकी टिळेकर या सगळ्यांनी ही जबाबदारी सांभाळली आहे. अभिनयाच्या माध्यमातून या चित्रपटाला जिवंत रूप देणार आहेत लोकप्रिय आणि प्रतिभावान अभिनेत्री पूजा सावंत आणि शर्मिला राजाराम शिंदे देखील दिसणार आहेत. प्रत्येक पायरीवर महिलांचाच ठसा असलेला हा आगळावेगळा चित्रपट मराठी चित्रपटसृष्टीसाठी आणि महिला सशक्तीकरणाच्या दृष्टीने एक अभिमानास्पद पाऊल ठरेल.
महिलांच्या जीवनातील सूक्ष्म भावना, अनुभव, स्वप्नं आणि संघर्ष या चित्रपटाच्या माध्यमातून प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तसेच लग्नानंतरचं आयुष्य मुलीसाठी केवळ नव्या जबाबदाऱ्यांचं दार उघडत नाही, तर ते तिच्या जीवनप्रवासातील एक नवा अध्याय, नवी वाटचाल आणि नातेसंबंधांच्या नव्या ओळखींचा आरंभ ठरतो, हे सर्व “लग्न आणि बरंच काही” या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. या चित्रपटाची घोषणा विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर करण्यात येत आहे तर हा चित्रपट २०२६ च्या महिला दिनाच्या महिन्यात प्रदर्शित होणार आहे.
मराठी चित्रपटसृष्टीत महिलांच्या सर्जनशीलतेचा आणि सामर्थ्याचा ठसा उमटवणारा “लग्न आणि बरंच काही” हा चित्रपट निश्चितच एक प्रेरणादायी सिनेमा ठरेल. “लग्न आणि बरंच काही” हा फक्त एक चित्रपट नसून, तो स्त्रीशक्तीचा उत्सव, गौरव आणि मराठी चित्रपटसृष्टीला लाभलेली नवी उभारी आहे. या चित्रपटाला आता प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.