
'क्रांतीज्योती विद्यालय' मराठी प्रेक्षकांनी भरली!
नवीन वर्षात प्रदर्शित झालेला ‘क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच चालतोय. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच याची जोरदार चर्चा सोशल मीडियावर होत होती. दमदार स्टार कास्ट, हेमंत ढोमे यांचे दिग्दर्शन आणि ज्वलंत विषय यामुळे या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये चांगलेच कुतूहल पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रभरात फोक आख्यान गाजवण्याऱ्या संगीतकारांनी म्हणजेच हर्ष-विजय यांनी या चित्रपटाला संगीत दिले आहे.
चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षक आणि समीक्षकांनी याचे भरभरून कौतुक केले. या चित्रपटातील गाणी आधीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरून सुपरहिट ठरली होती. त्यातच या सिनेमाचा विषय विशेषतः मराठी शाळेत शिक्षण घेतलेल्या प्रेक्षकांच्या मनाला स्पर्श करणारा असल्याने एक भावनिक नातं निर्माण झालं आहे. त्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी प्रेक्षक पुन्हा एकदा या मराठी चित्रपटाकडे आकर्षित होत आहेत. चला या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल जाणून घेऊयात.
‘क्रांतीज्योती विद्यालय मराठी माध्यम’ चित्रपटाने पहिल्याच आठवड्यात 6. 14 कोटींची दमदार कमाई केली आहे. याबाबत चित्रपटाच्या टीमने सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. तसेच माहितीनुसार, चित्रपटाचे बजेट 2 कोटी असल्याचे बोलले जात आहे. एकंदरीत चित्रपटाने बजेटपेक्षा जास्त कमाई केली आहे.
चित्रपटाच्या टीमने महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये जाऊन अनेक शाळांमध्ये या सिनेमाचे प्रमोशन केले होते. या दरम्यान कलाकारांनीही आपल्या शालेय आठवणींना उजाळा दिला. आताही अनेक जण आपल्या शाळेतील मित्र-मैत्रिणींसोबत हा सिनेमा पाहण्यासाठी आवर्जून जात आहेत.