(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
कलर्स मराठीवरील जय जय स्वामी समर्थ या मालिकेतली नवरात्र, स्वामी भक्तांसाठी विशेष ठरणार आहे. यंदाच्या नवरात्रात आदिमाया स्वरूप स्वामींचे दिव्य दर्शन प्रेक्षकांना घडणार आहे. स्वामींच्या आदिमाया रूप दर्शनाची आतुरता प्रेक्षकांना नेहमीच असते, आणि यंदाच्या नवरात्रात भक्तांची ही इच्छा पूर्ण होणार आहे.
राधा आणि तिच्या कुटुंबाच्या संघर्षाची कथा या नवरात्रात सादर होत असूंन आदिमाया स्वरूप स्वामींचे दिव्य दर्शन घडवताना शक्ती आणि भक्तीची गोष्ट उलगडणार आहे. या नवरात्र पर्वात राधाच्या घरातील शतकानुशतक जुना अंबाबाईचा मुखवटा, घरावरचं संकट आणि स्वामींचं आदिमाया रूप यांचा अनोखा संगम साकारला जाणार आहे. या माध्यमातून भक्तीची, श्रद्धेची आणि देवत्वाच्या विजयाची नवी कथा उलगडेल. श्री स्वामी समर्थ मालिकेने नुकतेच 1600 भागांचा टप्पा गाठला असून मराठी मालिकेतील हा सर्वात मोठा टप्पा असल्याचेही दिसून येत आहे
या कथानकाचा प्रोमोही सध्या विशेष गाजतो आहे.यात स्वामींच्या अस्वस्थतेतून नारळ खेळवण्याच्या दृश्याने सुरुवात होते, राधा देव्हाऱ्यासमोर उभी राहते आणि तिच्या दृष्टीने देवीचा मुखवटा गायब झालेला दिसतो. देवीने साथ सोडली का, असा प्रश्न पडताच स्वामी आदिमाया रूपात प्रकट होतात आणि धीर देत म्हणतात – “तुझी साथ कुणीही सोडून गेलं तरी आम्ही तुझी साथ कधीच सोडणार नाही.
” या खास प्रसंगामुळे मालिकेत भक्ती, श्रद्धा आणि धैर्याचा एक नवा अध्याय सुरू होणार आहे. नवरात्रात स्वामींच्या आदिमाया रूप दर्शनामुळे प्रेक्षकांना दिव्य आणि हृदयस्पर्शी अनुभव मिळेल, यात शंका नाही.
“जय जय स्वामी समर्थ” ही मालिका श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज यांच्या जीवनावर आधारित आहे. महाराजांच्या चमत्कारी आणि आध्यात्मिक कार्य या मालिकेतून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवले जाते. भक्तांच्या अडचणी सोडवणे, समाजातील अज्ञान दूर करणे आणि सर्वांना अध्यात्मिक मार्ग दाखवणे, हेच या मालिकेचं मुख्य सूत्र आहे.