'पिंगा गं पोरी पिंगा' मधील ऐश्वर्या शेटेचा अनुभव
कलर्स मराठीवरील ‘पिंगा गं पोरी पिंगा’ या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलंय. मैत्री आणि ती देखील मुलींची मैत्री हा विषय सर्वांनाच जिव्हाळ्याचा वाटतोय. यामध्ये वल्लरीची भूमिका साकारणारी अभिनेत्री ऐश्वर्या शेटे तिच्या सहजाभिनय आणि खानदेशी भाषेच्या लहेजामुळे प्रेक्षकांना खूपच आवडतेय.
नवराष्ट्रने इंद्रायणी आणि पिंगा गं पोरी पिंगा या मालिकेच्या महासंगमच्या निमित्ताने ऐश्वर्याशी खास बातचीत केली. ऐश्वर्यानेदेखील अगदी मनापासून भरभरून प्रतिसाद दिला. ऐश्वर्याने वल्लरीची भूमिका इतकी छान केली आहे की, तिला खानदेशी भाषा येत नाही यावर कोणी विश्वास ठेवणार नाही. त्यामुळे तिची मुलाखत घेताना सुरूवातील हाच प्रश्न विचारणं अगदी साहजिक होतं. काय म्हणाली ऐश्वर्या जाणून घ्या
वल्लरी साकारताना भाषेचा अभ्यास केला का?
ऐश्वर्याने अगदी क्षणही न दवडता सांगितले की, खानदेशी भाषा बोलणं हे खूप मोठं आव्हान होतं. कारण याआधी कलर्स मराठीवरील ‘रमा माधव’ ही मालिका करताना ब्राम्हणी प्रमाणभाषेतील संवाद होते आणि त्यानंतर वल्लरी करताना अगदी शांत स्वभावाची आणि समजून घेणारी समंजस खानदेशी भाषेतील भूमिका साकारायची होती. खानदेशी भाषेची अजिबात सवय नव्हती आणि म्हणून भाषा कशी बोलावी, खानदेशी लोकांना आपलंसं वाटेल यासाठी १ महिना ही भाषा व्यवस्थित शिकून घेतली. यामध्ये दिग्दर्शकांची आणि अभिनेता-सहकलाकार असणाऱ्या आशिष कुलकर्णीने खूप मदत केली असं आवर्जून सांगितले.
इतकंच नाही तर संपूर्ण वैदर्भिय भाषा वेगळी आहे. पण आपलीशी वाटेल आणि प्रेक्षकांना खिळवून ठेवले इतकी सांगड घालून लेखकाकडून समजून घेऊन त्यानुसार मध्य गाठायचा प्रामाणिक प्रयत्न करत असल्याचेही तिने सांगितले आणि म्हणूनच कदाचित वल्लरी ही भूमिका सर्वांना आपल्यातली एक वाटत असावी
महासंगम करताना काही आव्हानं आली का?
दुसऱ्या मालिकेतील कलाकारांसह काम करताना बरेचदा आव्हानं येतात पण तसं काहीही झालं नाही अगदी शून्य आव्हानं आली असं ऐश्वर्या पटकन बोलून गेली. पण एक मोठं आव्हान आलं ते म्हणजे Action Scene करताना उंचीची भीती वाटत असल्यामुळे नक्की कसं करायचं तेच कळत नव्हतं. पण दिग्दर्शकांचा विश्वास आणि आव्हान असूनही करायची जिद्द यामुळे हे एका टेकमध्येच करणं शक्य झाल्याचे अभिमानाने ऐश्वर्याने सांगितले. तसंच इंद्रायणीच्या कलाकारांचेही तिने कौतुक केले.
वल्लरीच्या आयुष्यात सुमन कोणतं नवं वादळ आणणार? ‘पिंगा गं पोरी पिंगा’मालिकेला नवं वळण
अभिनयाची सुरूवात कशी झाली?
यावर ऐश्वर्याने जे सांगितले त्यावर खरं तर विश्वास बसणार नाही, पण ती म्हणाली, ‘शाळेत असताना स्वतःबद्दल विश्वास अजिबात नव्हता. शाळेत अनेदा यासाठी Bully करण्यात आलं होतं. पण मोठेमोठे संवाद घरात आईला बोलून दाखवत होते आणि त्यातून आईला टॅलेंट दिसल्याने तिने बालनाट्यशिबीरात शाळेच्या सुट्टीत घातले. इथपासूनच खऱ्या प्रवासाला सुरूवात झाली’
यानंतर पुढे वल्लरीने तिचे बालपणच जणू डोळ्यासमोर आणत सांगितले की, स्टेजवर गेल्यावर खरं तर गोडी निर्माण झाली आणि आज जो काही आत्मविश्वास आहे तो फक्त आणि फक्त स्टेज आणि आईमुळे आहे कारण तिने माझ्यातील कलाकाराला ओळखले.
कसा मिळाला ब्रेक
गेले 8 वर्ष मराठी इंडस्ट्रीमध्ये काम करत असल्याचे ऐश्वर्याने अभिमानाने सांगितले. सुरूवात लहानसहान भूमिकांपासून केली. पण खरं तर ८ वर्षांपूर्वी सुचित्रा बांदेकर यांच्यामुळे ब्रेक मिळाला आणि त्यांनी अगदी घरातील असल्यासारखंच वागवलं, त्यामुळे कधी ही इंडस्ट्री परकी वाटली नाही. ‘ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण’ सारख्या मालिकेतून प्रेक्षकांमधून ओळख मिळाली. पण ‘रमा माधव’ मध्ये पहिली लीड भूमिका केली आणि खरा ब्रेक मिळाला आणि वल्लरीच्या भूमिकेने तर आता त्यावर चारचाँद लावले आहेत. एकामागोमाग काम करत गेल्याने कधी कशाची कमतरता भासली नाही
कलर्स मराठीवर ‘महासंगमचा महाआठवडा’; ‘इंद्रायणी’ आणि ‘पिंगा गं पोरी पिंगा’ मालिकांचा जबरदस्त संगम!
बालनाटकांपासून सुरूवात करूनही अजून नाटक का केले नाही?
यावर ऐश्वर्याने खंत व्यक्त केली की, यावेळी तिला नाटकाचा प्रस्ताव आला होता. ‘ज्याची त्याची लव्ह स्टोरी’ हे नाटक ती करणार होती पण काही कारणामुळे आणि ‘पिंगा गं पोरी पिंगा’ मालिका मिळाल्यामुळे तिला ते करता आले नाही.
नाटकामध्ये काम करण्याची खूप इच्छा आहे असंही तिने सांगितले आणि नाटकांचा कुठलाही Form अनुभवायला आपल्याला आवडेल असंही ऐश्वर्या म्हणाली. नाटकाने विश्वास दिलाय आणि त्यामुळे नाटकाच्या कोणत्याही स्वरूपाबाबत आपण निवडक होऊ शकत नाही असंही तिने स्पष्टपणे सांगितलं. नाटकातील कोणतीही भूमिका असेल तर आपण नक्की करू आणि ती संधी लवकरच यावी असंही वाटतंय अशी आशाही तिने व्यक्त केली.
अभिनेत्री म्हणून ओळख मिळवून देईल अशी कोणतीही भूमिका नाटकातून साकारायची इच्छा असल्याचेही तिने अगदी मनापासून व्यक्त केले आहे. सध्या ऐश्वर्या ‘पिंगा गं पोरी पिंगा’ मध्ये व्यस्त असली तरीही तिने नाटकाबाबत आपलं प्रेम अगदी मनापासून व्यक्त केलंय. आतापर्यंत वेगवेगळ्या भूमिका साकारत असणारी ऐश्वर्या सध्या मात्र वल्लरीच्या भूमिकेत प्रेक्षकांचं मन जिंकत आहे आणि यापुढेही तिला असंच प्रेम मिळत राहील अशी तिला खात्री आहे.