सलमान आणि शाहरूख जे नाही करू शकला ते अल्लू अर्जूनने करून दाखवलं, 'पुष्पा २ द रूल'ची देशभरात चर्चा
अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना स्टारर ‘पुष्पा २’ चित्रपटाची चाहत्यांमध्ये कमालीची क्रेझ पाहायला मिळत आहे. चित्रपटाची घोषणा केल्यापासून प्रेक्षक चित्रपटासाठी उत्सुक आहेत. येत्या ५ डिसेंबरला हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. आता अशातच चित्रपटाच्या ट्रेलरची जोरदार चर्चा होत आहे. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्नाच्या चाहत्यांची प्रतिक्षा अखेर संपली आहे. आपल्या आवडत्या सेलिब्रिटींनी लाडक्या फॅन्ससाठी ट्रेलर रिलीजची तारीख आणि वेळ जाहीर केली आहे. त्यामुळे आता प्रेक्षकांमध्ये ट्रेलरबद्दल कमालीची उत्सुकता आहे.
काही तासांपूर्वीच अल्लू अर्जुनने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत, चाहत्यांसोबत ट्रेलर रिलीजची तारीख आणि वेळ शेअर केली आहे. अल्लू अर्जुनने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केलेल्या पोस्टरवर ट्रेलरबद्दल माहिती दिली आहे. येत्या १७ नोव्हेंबरला म्हणजेच पुढच्या रविवारी पाटण्यामध्ये संध्याकाळी ६ वाजून ३ मिनिटांनी अल्लू अर्जुनच्या आणि रश्मिका मंदान्नाच्या बहुचर्चित ‘पुष्पा २’चा भव्य दिव्य ट्रेलर लाँचिंग इव्हेंट पार पडणार आहे. टीझर आणि २ गाणे रिलीज झाल्यानंतर अखेर चित्रपटाचा बहुप्रतिक्षित ट्रेलर रिलीज होणार आहे.
‘पुष्पा २’च्या ट्रेलरची रिलीज डेट काही दिवसांपूर्वीच लॉक झाली आहे. पण कलाकारांनी आज (११ नोव्हेंबर) जाहीर केली आहे. सोशल मीडियावर ट्रेलर रिलीजच्या तारखेची जोरदार चर्चा सुरू होती. बहुप्रतिक्षित ‘पुष्पा २’ चित्रपट ५ डिसेंबरला जगभरात रिलीज होणार आहे. पूर्वी चित्रपट स्वातंत्र्यदिनी रिलीज होणार होता. अखेर ‘पुष्पा २’ची रिलीज डेट ५ डिसेंबरला जाहीर करण्यात आलीय. त्यामुळे २०२४ च्या अखेरीस ‘पुष्पा २’ बॉक्स ऑफिसवर धमाका करणार, ही शक्यता नाकारता येत नाही. आता सर्वांना ‘पुष्पा २’च्या ट्रेलरची उत्सुकता आहे. ‘पुष्पा २’चा ट्रेलर रिलीज होण्याआधीच अल्लु अर्जुनच्या चित्रपटाचे अमेरिकेत हजारो तिकीट विकले आहेत.
चित्रपटाच्या रिलीजला अजून महिना बाकी आहे. तोच चित्रपटाचे आतापर्यंत १५,००० हून अधिक तिकिटे विकले गेले आहेत. अमेरिकेत ‘पुष्पा २’ ४ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. तर भारतात ५ डिसेंबरला रिलीज होणार आहे. ॲडव्हान्स बुकिंगमधून अमेरिकेत एवढ्या लवकर १५ हजार तिकिटे विकली जाणारा ‘पुष्पा २’ हा पहिला भारतीय चित्रपट ठरला आहे. यातून चित्रपटाने तब्बल ५०० कोटी डॉलरची कमाई केली आहे. याबाबत पुष्पाच्या मेकर्सकडून माहिती देण्यात आली आहे. चित्रपट प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी १०० हून अधिकची कमाई करण्याची शक्यता आहे. निर्माते चित्रपटाचे संपूर्ण भारतात जोरदार प्रमोशन करणार असल्याचे बोलले जात आहे. ‘पुष्पा’च्या तुलनेत ‘पुष्पा 2’ हिंदीत अधिक चांगली कामगिरी करेल, असे बोलले जात आहे.