फोटो सौजन्य - pinterest
प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेते आमिर खान आणि रीना दत्ता यांचा मुलगा जुनैद खान याने नेटफ्लिक्सच्या “महाराज” या चित्रपटातून फिल्म इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केले आहे. त्याचा हा डेब्यू सिनेप्रेमींमध्ये चर्चेचा विषय बनला आहे. अभिनेते आमिर खान यांचे चिरंजीव असल्याने त्यांच्या चाहतावर्गाची जुनैदला मोठ्या पडद्यावर पाहण्याची इच्छा होती, जी आता फक्त पूर्णच झाली नसून नेटफ्लिक्सवर धमालदेखील करत आहे. “महाराज” या चित्रपटातील जुनैदचे अभिनय प्रेक्षकांच्या मनात जागा करत असल्याचे दिसून येत आहे.
टाइम्स ऑफ इंडियाला मुलाखत देताना जुनैदने एका गोष्टीचा खुलासा केला की त्याने दोन वर्षांपूर्वी त्याच्या वडिलांच्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पणासाठी ऑडिशन दिले होते, पण त्याने गोष्ट काही बनली नाही. जुनैद खान म्हणाला, “मी ‘लाल सिंह चड्ढा’साठी ऑडिशन दिले होते, ज्याबद्दल वडिलांनीदेखील सार्वजनिकरित्या सांगितले होते. या चित्रपटासाठी मी वजनही कमी केले होते, पण गोष्ट काही बनली नाही. हा चित्रपट मी करावा अशी वडिलांची इच्छा होती, पण तसे काही होऊ शकले नाही.”
दरम्यान, “महाराज” हा चित्रपट 1862 च्या महाराज लिबल केसवर आधारित असून चित्रपटाचे दिग्दर्शक सिद्धार्थ पी. मल्होत्रा आहेत. जुनैद खानच्या “महाराज” या डेब्यू चित्रपटाचे दिग्दर्शक सिद्धार्थ पी. मल्होत्रा यांनी खुलासा केला की जुनैदने आमिर खानच्या “लाल सिंह चड्ढा” या चित्रपटासाठी ऑडिशन दिले होते आणि तीच ऑडिशन क्लिप पाहिल्यानंतर त्याने त्याला “महाराज”मध्ये कास्ट केले. दिग्दर्शक म्हणाले की, “मी आणि आदित्य चोप्राने जुनैदची ‘लाल सिंह चड्ढा’ची ऑडिशन क्लिप पाहूनच त्याला चित्रपटासाठी कास्ट केले होते. काय ऑडिशन होती ती! मला आशा आहे की एक दिवस ती ऑडिशन क्लिप नक्कीच बाहेर येईल.”
या चित्रपटात जुनैद पत्रकार करसनदास मुलजी यांच्या भूमिकेत आहेत. तसेच हल्लीच बॉक्स ऑफिसवर शंभर कोटींचा टप्पा पार केलेल्या “मूंज्या” चित्रपटाची अभिनेत्री शर्वरीसुद्धा “महाराज” या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. “महाराज” या चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनात घर करणारा जुनैद सध्या पुढील प्रोजेक्टच्या तयारीत आहे. त्याचा येता चित्रपट “लव्ह टुडे” या हिट तमिळ चित्रपटाचे हिंदी रिमेक असणार आहे, ज्याचे दिग्दर्शन अद्वैत चंदन करणार आहे. या चित्रपटात त्याच्या सोबत खुशी कपूर झळकणार आहे.