प्रसाद ओकनं केलं समीर चौघुलेचं कौतुक, म्हणाला, “ “एकट्या”ने हे धाडस करणं जिकीरीचं, पण... ”
मराठी फिल्म इंडस्ट्रीतील लोकप्रिय कलाकार म्हणून प्रसाद ओकची आपल्या चाहत्यांमध्ये विशेष ओळख आहे. प्रसाद ओक एक प्रसिद्ध अभिनेता असून तो एक प्रसिद्ध दिग्दर्शकही आहे. त्याने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर चाहत्यांच्या मनामध्ये घर निर्माण केले आहे. दरम्यान, प्रसादने मराठी नाटक, चित्रपट आणि काही मालिकांमध्ये काम केले असून अनेक चित्रपटांचे त्याने दिग्दर्शन केले आहे. कायमच आपल्या अभिनयामुळे चर्चेत राहणारा प्रसाद ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातून परिक्षक म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अभिनेता प्रसाद ओक कायमच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ शोच्या परीक्षकाच्या खुर्चीत पाहायला मिळतो. नुकतेच प्रसाद ओकने या शोमधील विनोदवीर समीर चौघुलेचा ‘सम्या सम्या मैफिलीत माझ्या’ कार्यक्रम पाहिला आणि त्यानंतर त्याने समीरचे कौतुक करणारी पोस्ट लिहिली आहे.
विकी कौशलच्या ‘छावा’ला नंबर १ होण्यासाठी ‘या’ दोन चित्रपटांचं चॅलेंज, धुलिवंदनाला केली सर्वाधिक कमाई
प्रसाद ओकने ‘सम्या सम्या मैफिलीत माझ्या’ या कार्यक्रमातील समीर चौघुलेचा एक व्हिडीओ शेअर करत लिहिले की,
“ “सम्या सम्या मैफिलीत माझ्या” तुझेच मी गोडवे गात आहे..अजूनही वाटते मला की..अजूनही हास्य रात आहे..सम्या सम्या मैफिलीत माझ्या..सम्या तुला भेटतात ना रे ? चार्ली आणि पु लं ही एकाच वेळी पुन्हा पुन्हा खात्री होत जाते ते देतात तुला जादूची एक गोळी. समीर चौघुले या आमच्या मित्राचा “सम्या सम्या मैफिलीत माझ्या” हा कार्यक्रम… नव्हे हा चमत्कार… मी प्रत्यक्ष पाहिला… कणेकर, उपाध्ये यांच्या कार्यक्रमांनंतर कित्येक वर्षांनी मी थेट हा कार्यक्रम पाहिला आणि भारावून गेलो… समीरची मराठीवर असलेली पकड… स्वच्छ आणि शुद्ध विनोद निर्मितीचं त्याला असलेलं भान हे सगळं मी “हास्यजत्रेत”अनेकदा बोलतोच, पण तिथे तो अनेक कलाकारांसोबत असतो.. आणि इथे तो “एकटा” असतो… पूर्ण वेळ… २:३० तास… आणि २:३० तास हा एकटाच आहे हे आपल्याला कार्यक्रम संपल्यावरच कळतं… सध्या ७/७ ८/८ कलाकार असलेल्या नाटकांचा ट्रेंड असताना… “एकट्या”नी हे धाडस करणं खरच जिकीरीचं होतं… पण “सम्या”मुळे ते सहज साध्य झालं. सम्या तुला खूप खूप खूप प्रेम… आणि कोटी कोटी कोटी शुभेच्छा…!!! हा कार्यक्रम बघाssssssच…!!! मुंबईतला पहिला शो १६ तारखेलाच आहे… आणि तो advance मधेच housefullllll झाला आहे…!!!! पण पुढच्या shows च्या जाहिराती येत राहतील..!!! ”
प्रसाद ओकने शेअर केलेल्या पोस्टवर समीर चौघुलेनेही कमेंट केली आहे. “प्रसाद ओक आणि मंजिरी ओक मनापासून आभार…, तुझ्यासारखे भरभरून प्रेम करणारे मित्र असतात म्हणून जीवन आनंदी असतं… खूप खूप प्रेम” अशी कमेंट समीरने केली आहे. हास्यजत्रेनंतर आता प्रसाद ओक आणि समीर चौघुले दोघेही एकत्र ‘गुलकंद’ चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हा चित्रपट येत्या १ मे ला रिलीज होणार आहे.