"'मेलेला मराठा' विरुद्ध 'मारणारे वंजारी' अशी कळ ठरवून लावली जातेय..."; संतोष देशमुख प्रकरणी किरण मानेंची पोस्ट
बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली होती. सरपंचाच्यां हत्येचं आतापर्यंत फक्त वर्णन करण्यात आलं होतं. पण आता त्यांच्या हत्येच्या वेळेचे फोटो समोर आले आहेत. ते फोटो पाहिल्यानंतर अंगाचा थरकाप उडाल्याशिवाय राहत नाहीत. हत्येचे फोटो पाहिल्यानंतर त्यांची हत्या किती क्रुरतेने करण्यात आली, याचा अंदाज आपण फोटो पाहून करु शकतो. दरम्यान, सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो सीआयडीने दाखल केलेल्या चार्जशिटमध्ये आहेत. ज्यावेळी त्यांची हत्या करण्यात येत होती, त्यावेळेस त्यांचे व्हिडीओ काढले गेले. ते व्हिडीओ सीआयडीच्या हाती लागले आहेत.
संतोष देशमुख प्रकरणावर मराठमोळ्या सेलिब्रिटींची पोस्ट; म्हणाले, “विकृताची परिसीमा आहे ही…”
संतोष देशमुख यांची हत्या करताना जो त्रास दिला गेला, त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. यानंतर संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणाचे पडसाद फक्त महाराष्ट्राच्या राजकारणातच नाही तर, जनसामान्यांपासून मराठमोळ्या सेलिब्रिटींमध्येही उमटत आहेत. काही सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणावर आपला संताप व्यक्त केला आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’चे दिग्दर्शक सचिन गोस्वामी आणि ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम पृथ्वीक प्रताप यांच्या पोस्टनंतर अभिनेते किरण मानेंनीही इन्स्टाग्राम पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणावर इन्स्टा पोस्ट शेअर केली आहे.
बहुजनांनो, संतोष देशमुखला न्याय मिळवूनच द्यायचा असेल तर पहिल्यांदा ‘जात’दूर ठेवा. संतोषच्या मृत्यूचा व्हायरल केलेला फोटो हे अनाजीपंती कपट असू शकतं. बळी पडू नका. आपल्याला जातीजातीत लढवून जुलमी सत्तेचा फास सर्वसामान्यांभोवती आवळायचा हा डाव आहे! कमकुवत पडत चाललेल्या कोरटकरी, सोलापूरकरी गिधाडांना बळ देण्यासाठी आपल्यात फुट पाडण्याचा कट आहे हा.
खून झालेला एक तुमच्या- माझ्यासारखा ‘माणूस’होता… आणि मारेकरी माजोरड्या सत्ताधाऱ्यांचा वरदहस्त असणारे आहेत! वर्तमानात आपल्या भवताली याच दोन जाती आहेत. ‘सामान्य माणूस विरूद्ध सत्तेतले नराधम’… याच दोन जातीत सध्याचा संघर्ष सुरू आहे, हे मेंदूत कोरून घ्या.
‘मेलेला मराठा’ विरुद्ध ‘मारणारे वंजारी’अशी कळ ठरवून लावली जात आहे… गुन्हेगारांच्या म्होरक्याला वाचवण्यासाठीचं ते कारस्थान आहे. एक सत्य समजून घ्या की याच मारेकरी नराधमांनी याच बीडमध्ये अनेक वंजाऱ्यांचाही बळी घेतला आहे!
…त्यामुळं संतोष देशमुख प्रकरणात बोलताना ‘मराठा-वंजारी’ अशा जातीवरून कमेंट करू नका. फक्त ज्या सत्ताधाऱ्यांच्या बळावर त्यांनी हे निर्घृण कृत्य केलं त्या सत्ताधाऱ्यांना टारगेट करा.
बीड हे अत्यंत प्राचीन समृद्ध वारसा असलेलं ऐतिहासिक गांव आहे. त्याला हिणवण्यासाठी बिहारची उपमा देऊ नका. खुद्द महात्मा गांधींनी सत्याग्रहात संपूर्ण भारतातून जे पहिले सहा सत्याग्रही निवडले त्यात बीडचे हिरालाल सुखलालजी कोटेचा होते ! पानिपतात हरल्यानंतर निजामशाहीला पराभूत करून मराठ्यांमध्ये पुन्हा नवचैतन्य आलं ते याच भूमीत. याच बीडमध्ये शंभर वर्षांपूर्वी अत्यंत दानशूर असलेल्या धोंडोजी किसन यांनी मुस्लिम बांधवांसाठी स्वखर्चानं मशीद बांधून दिली होती! तो परिसर आजही धोंडीपुरा या नावानं ओळखला जातो.
अशा बीडला गुन्हेगारीचा कलंक लागणं हे गृहमंत्र्यांचं अपयश आहे. बीड हा महाराष्ट्राचा अभिमान होता. पुढे रहावा असे वाटत असेल तर जातपात बाजूला ठेवा. संतोष देशमुख प्रकरणात कोण आहेत, त्यांना कुणाचा वरदहस्त आहे हे जगजाहीर आहे. त्या सगळ्यांना अटक होऊन शिक्षा झाली पाहिजे यावर जोर द्या !