'काहे दिया परदेस'नंतर शिव-गौरी पुन्हा एकत्र, कालचक्र थांबवण्यासाठी येतोय 'समसारा'; मोशन पोस्टरने वेधलं लक्ष
झी मराठीवरील ‘काहे दिया परदेस’ मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. मालिकेमध्ये प्रमुख भूमिकेत, सायली संजीव आणि ऋषी सक्सेना होते. आता या मालिकेनंतर हे दोघंही एका चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकतंच या चित्रपटाची घोषणा करण्यात आली असून या भयपटाचे किंवा रहस्यपटाचे नावंही जाहीर करण्यात आले आहे. ‘समसारा’ असं त्या चित्रपटाचं नाव असून चित्रपटाची रिलीज डेट जाहीर करताना चित्रपटाचा मोशन पोस्टर आणि पोस्टर देखील शेअर करण्यात आला आहे.
‘फँड्री’ फेम राजेश्वरी खरात झाली ख्रिश्चन; शालूने धर्म बदलल्याने चाहते झाले नाराज…
अत्यंत वेगळ्या धाटणीचा आणि दमदार स्टारकास्ट असलेला ‘समसारा’ चित्रपट येत्या २० जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. चित्रपटाचं अतिशय धीरगंभीर असं मोशन पोस्टर लाँच करण्यात आलं असून, ‘समसारा’ सध्याच्या मराठी चित्रपटसृष्टीत उल्लेखनीय चित्रपट ठरणार आहे. ‘देव, दानव, असुर, मानव यांच्यातला एक पडला तरी दुसरा उभा राहतो. हे चक्र सुरू राहतं. पण हे चक्र थांबवायला काळ स्वतः जागा होतोय. आम्ही येतोय…’ असे शब्द धीरगंभीर आवाजात ऐकू येतात आणि त्यातून समसारा चित्रपटाचं पोस्टर समोर आलं आहे. अत्यंत कल्पक असं हे पोस्टर असून, त्यातून चित्रपटाच्या कथानकाचा नेमका अंदाज बांधता येत नाही. अतिशय सूचक अशा प्रकारचं हे पोस्टर आहे. त्यामुळे दमदार स्टारकास्ट असलेल्या समसारा या चित्रपटाविषयी उत्सुकता प्रचंड वाढली आहे. हा चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी २० जूनपर्यंत वाट पहावी लागणार आहे.
संचय प्रॉडक्शन्स प्रस्तुत ‘समसारा’ची निर्मिती पुष्कर योगेश गुप्ता यांनी केली असून, दिग्दर्शनाची जबाबदारी सागर लढे यांनी सांभाळली आहे. कथा सागर लढे, विश्वेश वैद्य आणि समीर मानेकर यांची असून, पटकथा सागर लढे आणि समीर मानेकर यांनी लिहिली आहे. तर समीर मानेकर, निहार भावे यांनी संवादलेखन केलं आहे. विश्वेश वैद्य यांनी संगीत, अक्षय राणे छायांकनाची जबाबदारी निभावत आहेत. सायली संजीव, ऋषी सक्सेना, पुष्कर श्रोत्री, डॉ गिरीश ओक, नंदिता धुरी, प्रियदर्शनी इंदलकर, तनिष्का विशे, यशराज डिंबळे, कैलास वाघमारे, साक्षी गांधी अशी उत्तम स्टारकास्ट या चित्रपटात आहे. कार्यकारी निर्माता म्हणून महेश भारंबे व अन्वय नायकोडी काम पाहणार आहेत.