Hemant Dhome Fumes On Cm Devendra Fadnavis Decision Hind Mandatory In Maharashtra Education Syllabus
येत्या शैक्षणिक वर्षापासून राज्यात, २०२५- २६ पासून सीबीएससी बोर्ड पॅटर्न लागू होत आहे. त्यानुसार राज्यातल्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना हिंदी भाषा सक्तीची करण्यात आली आहे .त्यामुळे आता मराठी आणि इंग्रजी माध्यमांना मराठी आणि इंग्रजीसोबत हिंदी ही तिसरी भाषा सक्तीची करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या नव्या त्रिभाषेच्या निर्णयाला विरोध केला जात आहे. सर्वच स्तरातून या निर्णयाला विरोध केला जात आहे. सर्वच स्तरातून या निर्णायाला विरोध होत असताना आता अभिनेता, लेखक आणि दिग्दर्शक म्हणून आपल्या प्रतिभेचा ठसा उमटवणाऱ्या हेमंत ढोमेने नुकतंच मराठी भाषेच्या संदर्भात एक खणखणीत आणि स्पष्ट वक्तव्य केलं आहे.
अभिनेता हेमंत ढोमेने एक्सवर पोस्ट शेअर करत स्वत:चं मत मांडताना अभिनेता म्हणतो की, “भारत, एक संघराज्य! राज्यघटनेने दिलेला अधिकार म्हणजे आपलं राज्य आपल्या पद्धतीने चालवायचं… म्हणून त्या त्या राज्याचं वेगळं सरकार! त्या सरकारांनी आपली संस्कृती, आपली भाषा, आपले विचार जपायचे आणि वाढवायचे! विविधतेने नटलेला माझा देश आता एकाच भाषेच्या आहारी का द्यायचाय? जपूद्या आपली भाषा प्रत्येकाला आणि वाढवूद्या आपली संस्कृती प्रत्येकाला!!! मुळावरच घाव घालायचं काम चालू आहे! हिंदी ही व्यवहाराची भाषा असूद्या ती आमच्या माथी मारू नका… आणि आहेच की ती शिकायला… येतेच आहे की व्यवहारापूरती… मग हा नवा अट्टाहास कशासाठी? महाराष्ट्रात मराठीच वाढली पाहिजे… येणाऱ्या पिढ्यांच्या अंगा खांद्यावर खेळली पाहिजे… त्यासाठी कष्टं करा! ” हेमंत ढोमेने पोस्टच्या शेवटी ‘#हिंदी_सक्ती_नकोच’ या हॅशटॅगचा वापर केला.
भारत, एक संघराज्य!
राज्यघटनेने दिलेला अधिकार म्हणजे आपलं राज्य आपल्या पद्धतीने चालवायचं… म्हणून त्या त्या राज्याचं वेगळं सरकार!
त्या सरकारांनी आपली संस्कृती, आपली भाषा, आपले विचार जपायचे आणि वाढवायचे!
विविधतेने नटलेला माझा देश आता एकाच भाषेच्या आहारी का द्यायचाय? जपूद्या…
— Hemant Dhome । हेमंत ढोमे (@hemantdhome21) April 19, 2025
दरम्यान, हेमंत ढोमेच्या या परखड मताला सोशल मीडियावर प्रचंड पाठिंबा मिळतोय. मराठीप्रेमी, लेखक, सेलिब्रिटी, आणि युवक- युवतींनी ढोमेच्या पोस्टवर प्रतिक्रिया देत “हीच खरी संवेदनशीलता” असं म्हणत त्याचं कौतुक केलं आहे. “100 % सहमत… हिंदी देशभरातल्या आणि इंग्रजी जगभरातल्या व्यवहाराची भाषा आहे हे कधी नाकारलं नाहीच. आवड म्हणून, पर्याय म्हणून ज्याने त्याने तो विषय निवडावा. त्यावर आक्षेप थोडीच आहे ? पण मराठी भाषा राज्यात आता नव्याने भाषेची सक्ती नको. महाराष्ट्रात निर्विवाद मराठीलाच प्राधान्य मिळायला हवं !” अशी कमेंट तेजस्विनी पंडितने केली आहे.