Entertainment (फोटो सौजन्य: social media )
अभिनेत्री प्रिया मराठेने अवघ्या ३८ व्या वर्षी शेवटचं श्वास घेतला आहे. या बातमीने मराठी मनोरंजन विश्वाला धक्काच बसला आहे. प्रिया मराठे गेल्या काही महिन्यापासून कर्करोगाचा उपचार घेत होती. मात्र प्रकृतीत सुधारणा न झाल्याने तिने आपला अखेरचा श्वास आज घेतला आहे. प्रिया मराठेने मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये दमदार भूमिका साकारून कमालीचे काम केले होते. ‘या सुखांनो या’, ‘चार दिवस सासूचे’, ‘तू तिथं मी’, ‘ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण’, ‘येऊ कशी कशी मी नांदायला’ या सारख्या गाजलेल्या मराठी मालिकांमध्ये आपली कमालीची भूमिका साकारून घरा घरात छाप पडली आहे. मराठी मनोरंजनविश्वात शेवटच्या वेळेस ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेत दिसली होती. याशिवाय ‘पवित्रा रिश्ता’, ‘उतरन’, ‘कसम से’, ‘बड़े अच्छे लगते है’ अशा हिंदी मालिकांमधूनही तिने ठसा उमटवला आहे. अचानक झालेल्या या निधनामुळे मराठी मनोरंजन क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. अनेक कलाकारांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहे. प्रिया मराठेच्या निधनाची बातमी मिळताच ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांनी हंबरडा फोडलाय.
काय म्हणाल्या उषा नाडकर्णी?
प्रिया मराठेंच्या निधनाची बातमी समजताच ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांनी हंबरडा फोडला. त्या म्हणाल्या ” मला खरंच फार वाईट वाटलं. मी अंकिताला भेटले तेव्हा आम्ही ठरवलं होतं की, तिला भेटायला जायचं. पण अंकिता मला म्हणाली, शंतनू म्हणतो येऊ नका. तिला भेटायची परिस्थिती नाही. म्हणजे त्यावेळी केस वगैरे गळत असतील. तरी देखील मी म्हटलं होतं. आपण तरीही तिला भेटायला जाऊया. पण वाटलं नव्हतं. ती इतक्या लवकर आमच्यातून जाईल. असं व्हायला नको होतं. देव का असं करतो, मला काही कळत नाही. त्या पोरीने आताच संसार उभा केला होता. देव तिच्या आत्म्याला शांती देवो.. तिचं जायचं वय नव्हतं.”
दिलीप ठाकूर यांनी व्यक्त केल्या भावना
दिलीप ठाकूर म्हणाले, “तिची एक्झिट चटका लावणारी आहे. गणेशोत्सव सुरु असताना तिचं जाणं अतिशय चटका लावणारं आहे. दिवसाची सुरुवात अशा पद्धतीच्या बातमीने व्हावी.. हे त्रासदायक आहे. काही कलाकारांच्या खासगी आयुष्यात हा संघर्ष आपल्यापर्यंत पोहोचत नाही. एकदम माहिती आल्यानंतर आपल्याला धक्का बसतो.”