
बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सलमान खानच्या (Salman Khan) घरावर रविवारी अज्ञात व्यक्तींकडून गोळीबार करण्यात आला. या गोळीबारानंतर पोलिसांनी २ आरोपींना गुजरात मधून अटक केली आहे. तसेच त्यांना १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आज त्यांना मुंबईमध्ये आणल्यानंतर कोर्टात हजर करण्यात आले. आरोपी २५ एप्रिलपर्यंत तुरुंगात असणार आहेत. मुंबई पोलीस दलाचे सह पोलीस आयुक्त गुन्हे शाखा लक्ष्मी गौतम यांनी आज मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेत सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबाराचा संपूर्ण घटनाक्रम सांगितला.
सह पोलीस आयुक्त लक्ष्मी गौतम म्हणाल्या, अभिनेता सलमान खानच्या घरावर दोन आरोपींना गोळीबार केला. त्यानंतर मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल करत हा तपास गुन्हे शाखेकडे दिला. घटनास्थळात दिसून आलेल्या सीसीटिव्हीमध्ये दुचाकी गाडीवरून आलेल्या ५ जणांनी सलमान खानच्या घरावर गोळीबार केला. त्यानंतर अनमोल बिष्णोई याने फेसबुकवर गुन्ह्यांसंबधीची एक पोस्ट शेअर केली होती. यामध्ये आरोपी गुजरातला पळून गेल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून दोन पथक गुजरातला पाठवण्यात आली.
मुंबई पोलीस पथकातील काही पोलीस आरोपीच्या मागावर होती. त्यांना आरोपींचे लोकेशन मिळाले. पण आरोपींकडे घातक शस्त्र असल्याने आम्ही भूज पोलिसांच्या मदतीने आरोपींना अटक केल्याचे लक्ष्मी गौतम म्हणाल्या. आज सकाळी दोन्ही आरोपीना मुंबईमध्ये आणण्यात आले. त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करून २५ एप्रिल पर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे.
अनमोल बिष्णोई मुख्य आरोपी
सह पोलीस आयुक्त लक्ष्मी गौतम म्हणाल्या, अनमोल बिष्णोई याने फेसबुकवर केलेल्या धमकीच्या पोस्टची आम्ही तपासणी करत आहोत. त्याची चौकशी केली जात आहे. तसेच तपासामध्ये जी माहिती समोर येईल त्यानुसार गुन्ह्यात कलमांची वाढ केली जाणार आहे. अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींवर याआधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र हे गुन्हे का दाखल करण्यात आले याचा आम्ही शोध घेत आहोत.
अभिनेता सलमान खानच्या घरावर गोळीबार झाल्यानंतर काही तासांनी अनमोल बिश्नोई या नावाने फेसबुक अकाउंटवरून जबाबदारी घेण्यात आली होती. हे खाते चालवणाऱ्या अनमोल बिश्नोई नावाच्या व्यक्तीवरसुद्धा FIR दाखल करण्यात आली आहे. अनमोल बिश्नोई हा तुरुंगामध्ये असलेल्या लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ आहे. तो सध्या परदेशामध्ये राहतो. १४ एप्रिलला पहाटेच्या सुमारास सलमान खानच्या घरावर गोळीबार करण्यात आला. यावर राजकीय वर्तुळात देखील अनेक चर्चा रंगल्या. अनेक नेत्यांनी सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबारावर प्रतिक्रिया दिली. गोळीबार करून आरोपी फरार झाले. मुंबई पोलिसांच्या हाती सीसीटीव्ही फुटेज मिळाल्याने आरोपींना शोधून काढणे सोपे झाले.