
(फोटो सौजन्य -सोशल मीडिया)
समोर आलेल्या वृत्तानुसार, टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार करण्यापूर्वी आरोपींनी सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करण्याची योजना आखली होती. याशिवाय अमिताभ बच्चन, आमिर खान आणि अक्षय कुमार यांच्या घरांबाहेरही त्यांनी पाहणी केली होती. या पाहणीदरम्यान आरोपींनी व्हिडिओ तयार करून परदेशात असलेल्या त्यांच्या हँडलरला पाठवल्याची माहिती तपासात समोर आल्याचे सांगितले जात आहे.
या खुलाशांनंतर मुंबई पोलिसांनी सलमान खानच्या घराबाहेरील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली आहे. इमारतीच्या आत आणि बाहेर, तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूंना पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आल्याची माहिती आहे.
टायगर श्रॉफच्या हालचालींवर ठेवली होती नजर
पोलिसांच्या माहितीनुसार, टायगर श्रॉफच्या चाहत्यांच्या सोशल मीडिया पोस्टवरून आरोपींना त्याच्या दिनक्रमाची माहिती मिळाली होती. अभिनेता दर रविवारी जुहू येथील पुष्पा नरसी मैदानावर फुटबॉल खेळण्यासाठी जात असल्याचं त्यांना समजलं. यावेळी त्याच्यासोबत पोलीस संरक्षण नसल्याची माहितीही आरोपींना मिळाल्याचं वृत्त आहे.
तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, सलमान खानला लक्ष्य करणं कठीण असल्याचं शूटर्सनी बिश्नोई टोळीतील कथित जवळचा सहकारी अमित पंडित याला सांगितलं होतं. त्यानंतर टायगर श्रॉफला लक्ष्य करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि हल्ल्याचा आदेश दिल्याचा आरोप आहे.
या कथित योजनेनुसार, दोन शूटर्स पिस्तूल घेऊन जुहू येथील फुटबॉल मैदानावर पोहोचले. तिथे त्यांनी काही वेळ टायगर श्रॉफच्या हालचालींवर नजर ठेवली. अभिनेत्याची गाडी मैदानाच्या गेटमधून बाहेर पडताच त्यांनी गोळीबार केल्याची माहिती पोलिसांच्या तपासातून समोर आल्याचं वृत्त आहे. या हल्ल्यात टायगर श्रॉफ थोडक्यात बचावल्याचं सांगितलं जात आहे.
प्राथमिक तपासानुसार, या घटनेत तीन आरोपी सहभागी असल्याचा संशय आहे. त्यापैकी दोघांनी गोळीबार केला, तर तिसरा आरोपी पळून जाण्यासाठी दुचाकी घेऊन तयार होता, अशी माहिती समोर आली आहे.
या प्रकरणात लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित आरोपींची चौकशी सुरू असून, हल्ल्यामागील नेमका कट आणि इतर संभाव्य लक्ष्यांबाबत तपास यंत्रणा अधिक माहिती गोळा करत आहेत.