फोटो सौजन्य - विजय थलापती इंस्टाग्राम
स्वप्न सगळेच पाहतात पण ते पूर्ण करण्याचे धाडस फार कमी लोकांमध्ये असते. आणि मनोरंजन विश्वात तर स्वतःची वेगळी ओळख निर्माण करायला फार काळ लागतो. तसंच ती ओळख टिकवून ठेवायला सुद्धा तितकीच मेहनत लागते. थलापती विजय हा दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेता आहे. आज (22 जून ) रोजी तो त्याचा 50 वा वाढदिवस साजरा करतोय. विजय थलापती याने दाक्षिणात्य सिनेसृष्टीत अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे.
22 जून 1974 रोजी चेन्नईमध्ये त्याचा जन्म झाला. अगदी लहान असल्यापासूनच त्याने बालकलाकार म्हणून काम सुरु केले आणि आपली अभिनयाची आवड अशीच पुढे चालू ठेवली. साऊथ फिल्मइंडस्ट्रीमध्ये विजय थलापती या नावाने प्रसिद्ध असला तरी त्याचे मूळ नाव जोसेफ विजय चंद्रशेखर आहे. विजयच्या वडिलांना त्याचे या क्षेत्रात काम करणे बिलकुल पसंत नव्हते. एस.ए. चंद्रशेखर म्हणजे विजयचे वडील हे प्रसिद्ध दिग्दर्शक आहेत. तरीही आपल्या मुलाने चित्रपटांमध्ये काम करावे अशी त्यांची अजिबात इच्छा नव्हती. या नकाराकडे दुर्लक्ष करून विजयने सिनेसृष्टीत प्रवेश केला आणि आज तो सर्वात उच्च स्थानावर आहे. लाखो लोक त्याचे चाहते आहेत.
विजयने वयाच्या अवघ्या 18 व्या वर्षी साऊथच्या चित्रपटात मुख्य अभिनेत्याची भूमिका केली. 1992 मध्ये त्याचा पहिला चित्रपट ‘नलाय थेरपू’ रिलीज झाला होता. या चित्रपटात विजयने प्रमुख नटाची भूमिका असली तरीही हा चित्रपट तितकासा चालला नाही. त्यांनतर विजयने सलग तीन चित्रपट केले आणि ते सुपरहिट ठरले. त्याने साऊथ सोबतच बॉलीवूडमध्ये सुद्धा काम केले आहे. त्याने बॉलीवूडच्या अनेक प्रसिद्ध अभिनेत्रींसोबत काम केले आहे.
साऊथचा सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता
मनोरंजन विश्वातील सर्वात प्रसिद्ध कलाकार म्हणून विजय थलापती याचे नाव घेतले जाते. विजयने अनेक सुपरहिट चित्रपट केले आहेत. त्याचे साऊथमधील चित्रपट हिंदीमध्ये डब केले आहेत. तसेच त्याच्या बऱ्याच सुपरहिट चित्रपटांचे बॉलीवूडमध्ये हिंदी रिमेक बनवले आहेत. आज दाक्षिणात्य सिनेसृष्टीमध्ये सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांच्या यादीत तो सर्वोच्च स्थानी आहे. विजयने 64 हून अधिक चित्रपटात काम केले आहे. त्याच्या किलर लूक आणि उत्कृष्ट अभिनयामुळे तरुणांमध्ये त्याची खूप क्रेझ आहे.